नांदेड लोकसभा : ३६ उमेदवारांनी घेतले ९६ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:03 AM2019-03-23T01:03:20+5:302019-03-23T01:03:49+5:30
लोकसभा निवडणुकीत १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे़ त्यात शुक्रवारी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले़ आतापर्यंत ११५ जणांनी २४० उमेदवारी अर्ज नेले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़ अमिता चव्हाण यांच्यासह भाजपाचे संतुकराव हंबर्डे व संजय कौडगे यांनीही अर्ज घेतले आहेत़
नांदेड : लोकसभा निवडणुकीत १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे़ त्यात शुक्रवारी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले़ आतापर्यंत ११५ जणांनी २४० उमेदवारी अर्ज नेले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़ अमिता चव्हाण यांच्यासह भाजपाचे संतुकराव हंबर्डे व संजय कौडगे यांनीही अर्ज घेतले आहेत़ दररोज अर्ज नेले जात असले तरी प्रमुख पक्षांनी मात्र आपले पत्ते अद्यापही उघड केले नाहीत़
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघासाठी २६ मार्चपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे़ २७ मार्चला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून २९ मार्चला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे़ उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल केला होता़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही अपक्षांनी उमेदवारी दाखल केली़
तर काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण व आ़ अमिता चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आले होते़ धुळवडीनिमित्त सुटी असल्याने शुक्रवारी दिवसभरात ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले आहेत़ सोमवारी उर्सची सुटी असली तरी, अर्जस्वीकृती मात्र सुुरु राहणार आहे़
शुक्रवारी एकूण सहा जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे़ त्यामध्ये साहेबराव भिवा गजभारे, शेख मुनीर शेख युसूफ, लतिफ उल जफर कुरेशी यांचे दोन, तुकाराम गणपत बिराजदार, अॅड़सुभाष खेम्मा जाधव, अल्ताफ अहमद इक्बाल अहमद, शेख इम्रान शेख मस्तान यांचा समावेश आहे़ या सर्व उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे़
संतुक हंबर्डे, कौडगे यांनी घेतले अर्ज
बुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी खा़अशोकराव चव्हाण तर आ़अमरनाथ राजूरकर यांनी आ़अमिताताई चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले होते़ त्यानंतर शुक्रवारी भाजपाचे महानगराध्यक्ष संतुक हंबर्डे आणि संजय कौडगे या दोघांनी अर्ज घेतले आहेत़ तर दुसरीकडे भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांनीही उमेदवारी अर्ज घेवून सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले आहे़ उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांनी अद्यापही पत्ते उघड केले नसले तरी, हा खेळ शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे़
आचारसंहितेमुळे होमगार्ड भरती पुढे ढकलली
जिल्हा होमगार्ड विभागातील रिक्त असलेल्या ३२५ जागांसाठी २५ ते २७ मार्च दरम्यान होणारी भरती प्रक्रिया आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली असून आचारसंहिता संपल्यानंतरच भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी दिली़ नांदेड मुख्यालयातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील १७२ पुरुष तर १५३ महिला होमगार्डच्या रिक्त पदासाठी २५ ते २७ मार्च दरम्यान नावनोंदणी करण्यात येणार होती़ २५ मार्च रोजी सकाळी आठ वाजेपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती़ त्यासाठी उमेदवारांनीही जय्यत तयारी केली होती़ परंतु भरती प्रक्रियेच्या काळातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे़
- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या काळात पैशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येते़ त्यावर आवर घालण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून गुुरुवारी रात्री इतवारा भागात नाकाबंदी करीत असताना एका चालकाकडे एक लाख रुपये आढळून आले़ पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून या रकमेबाबत व्यापाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही़ गुरुवारी धुळवडीनिमित्त शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ त्यानंतर रात्री नावघाट येथे नाकाबंदी लावण्यात आली होती़ यावेळी (एम़एच़२६, बीक़े़७०४४) या क्रमांकाच्या दुचाकीला पोलिसांनी अडविले़ या दुचाकीची तपासणी केली असता त्याच्या डिक्कीत एक लाख रुपयांची रक्कम आढळली़ ही रक्कम पोलिसांनी जप्त केली़