नांदेडचा पारा ४२़५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:37 AM2019-04-01T00:37:04+5:302019-04-01T00:37:32+5:30
यंदाचा उन्हाळा तापदायक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत असून गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे़
नांदेड : यंदाचा उन्हाळा तापदायक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत असून गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे़ रविवारी नांदेडचा पारा ४२़५ अंशावर गेला होता़ त्यामुळे नांदेडकरांच्या अंगाची लाहीलाही होत होती़ दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट होता़ सायंकाळी साडेसहा वाजेनंतरच रस्त्यावर वर्दळ दिसत होती़
नांदेडात मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती़ पहिल्या आठवड्यात ३५ अंशांवर असलेले तापमान दुसऱ्या आठवड्यात ३७ अंशावर गेले होते़ तर तिसऱ्या आठवड्यात त्याने चाळीशी गाठली होती़ त्यानंतर शेवटच्या आठवड्यात चाळीशी पार जात नांदेडकरांना चांगलेच घामाघूम केले़ गेल्या तीन दिवसांपासून सलग ४१ अंशावर असलेले तापमान रविवारी मात्र दीड अंशाने वाढले होते़ रविवारी ४२़५ अंश तापमान होते़ त्यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा लागत होत्या़ वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले़ त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट होता़