'नांदेड-मुंबई-नांदेड' राज्यराणी एक्स्प्रेसला अखेर मुहुर्त मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 07:01 PM2020-01-07T19:01:54+5:302020-01-07T19:04:20+5:30
१० जानेवारीपासून धावणार एक्स्प्रेस
नांदेड : नांदेड येथून मुंबईसाठी राज्यराणी एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती़ परंतु, रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळत नव्हता़ अखेर रेल्वे प्रशासनाने राज्यराणी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर केले असून सदर गाडी १० जानेवारीपासून धावणार आहे़ मुंबईसाठी नव्याने गाडी सुरू होत असल्याने नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़
मुंबई-मनमाडदरम्यान चालणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत वाढविण्यास मनमाडकरांचा विरोध होता़ परंतु, सदर गाडी नांदेडपर्यंत वाढविण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींसह रेल्वे संघटनांनी लावून धरली होती़ दरम्यान, दोन्ही ठिकाणच्या प्रवाशांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने मनमाड येथील प्रवाशांना स्वतंत्र डब्बे दिले आहेत़ सदर गाडी नवीन गाडी संख्येने धावणार आहे़ यामध्ये नांदेड ते मनमाड प्रवाशांसाठी एक एसी आणि आठ जनरल, नांदेडसाठी दोन एसी आणि तीन जनरल डब्बे असणार आहेत़ त्याचबरोबर एक एसएलआर डब्बा असेल़
गाडी संख्या २२१०२ आणि २२१०१ मनमाड-मुंबई -मनमाड गाडी आता नांदेडपर्यंत धावणार असून सदर गाडीचा नवीन नंबर १७६११ आणि नांदेड-मनमाड-मुंबई गाडीचा नंबर १७६१२ असा राहील़ नव्याने सुरू होत असलेली गाडी संख्या १७६११ नांदेड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड येथून रात्री १० वाजता सुटेल़
पुढे सदर गाडी पूर्णा स्थानकावर ११़३५ वाजता, परभणी - ११़१८ वाजता, मानवत रोड - रात्री ११़३९ वाजता, सेलू-११़५५ वाजजा, परतूर - मध्यरात्री १२़३५ वाजता, जालना- १़२३ वाजता, औरंगाबाद - २़३५ वाजता, लासूर - ३़१४ वाजता, रोटेगाव - ४़०१ वाजता, मनमाड येथे पहाटे ५़२० वाजता पोहचेल़ पुढे नाशिक रोड येथे ६़ १२ वाजता, देवळाई - ६़२३ वाजता, इगतपूरी- ७़१५ वाजता, कसारा - ७़४८ वाजता, कल्याण जं़ - ८़४८ वाजता, ठाणे - ९़१३ वाजता तर मुंबई येथे सकाळी १० वाजून ७ मिनिटाला पोहचेल़ सदर गाडी जवळपास ६०७ किलोमिटरचे अंतर १२ तासांमध्ये पूर्ण करणार आहे़
परतीच्या प्रवासासाठी सदर गाडी संख्या १७६१२ मुंबई येथून सायंकाळी ६़ ५० वाजता सुटेल़ कल्याण, मनमाड, नाशिक, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे सकाळी ७़२० वाजता पोहचेल़