पर्यायी पाण्यासाठी नांदेड महापालिका सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:30 AM2019-01-23T00:30:49+5:302019-01-23T00:32:31+5:30
शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली.
नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली.
विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ ३९.४९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा मार्च अखेरपर्यंत पुरणार आहे. त्याचवेळी प्रकल्पाच्या उपरोक्त भागातील धरणेही कोरडी पडल्याने पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे आहे त्याच पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पाणीप्रश्नाचे हे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेतली. प्रकल्प क्षेत्रातील डीपींचा विद्युतपुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला आदेशित करावे. त्याचवेळी प्रशासनाने स्थापन केलेल्या दक्षता पथकाला आदेश देवून पाणी उपसा करणारे विद्युतपंप जप्त करावे. प्रकल्पातून आजघडीला जवळपास ०.५७ दलघमी पाणी उपसले जात आहे.
राज्य वितरण कंपनीला आदेश देवून एक्स्प्रेस फीडर बंद करावे, तसेच अवैध पाणीउपसा रोखावा, अशी मागणीही जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. त्याचवेळी शहरात पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे आदेशही महापौरांनी दिले आहेत. शहरात असलेल्या विंधन विहिरी, हातपंप दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचवेळी शहराची मदार आता पैनगंगेच्या पाण्यावर काही प्रमाणात राहणार आहे. मात्र, हे पाणी सिंचन पाळ्यासाठी पाणी सोडल्यानंतरच महापालिकेला मिळणार आहे. पैनगंगेत १५ दलघमी पाणी महापालिकेने आरक्षित केले आहे. यातील दोन दलघमी पाणी पहिल्या टप्प्यात उचलण्यात आले आहे.
- विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात पथकांची निर्मिती केली आहे. मात्र ही सात पथके अद्यापही पूर्ण क्षमतेने कार्यरत न झाल्याने विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा सुरुच आहे.पथक क्र.२ मध्ये समाविष्ट असलेल्या नांदेड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही.आर. ऐटवार, नांदेड ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कदम, महावितरणचे लाईनमन शिंदे आणि वसरणीचे मंडळ अधिकारी बी.एस. देशमुख हे पथकाच्या कामावर सातत्याने गैरहजर असल्याचे पथकप्रमुख एस.एस. कोडगिरे यांनी कळविले आहे.
- विष्णूपुरी क्षेत्रातील पथकाचीच ही अवस्था आहे.तर अन्य पथकांबाबत न बोललेलेच बरे !अशीच परिस्थिती आहे. प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत असताना पथकातील अधिकारी-कर्मचारी नियमितपणे अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी कार्यरत राहणे आवश्यक असताना ते गैरहजर आहेत. या गैरहजर अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करावी, असे पत्र विष्णूपुरी पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिका-यांनी नांदेड उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे आता गैरहजर राहणा-या कर्मचा-यावर कारवाई होते की ‘जैसे थे’ च परिस्थिती राहील, हे पहावे लागणार आहे.