नांदेड महापालिकेचा मालमत्ता कराचा लाखाचा आकडा कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:40 AM2018-07-10T00:40:06+5:302018-07-10T00:41:29+5:30

महापालिका स्थापनेनंतर मालमत्ताधारकांच्या सामान्य करात दिवसेंदिवस वाढ होत गेली असून १९८०-८१ मध्ये मालमत्ताकराची १९ लाख ६९ हजार रुपयांची एकूण मागणी असलेल्या महापालिकेची २०१७-१८ ची मालमत्ताकराची मागणी १८ कोटी ९१ लाखांवर पोहोचली आहे. शहरात सध्या जीआयएस कंपनीकडून मालमत्तांचे मूल्यांकन केले जात असून करामध्ये जवळपास ४० टक्के वाढ अपेक्षित आहे.

Nanded Municipal Corporation's property tax is worth millions | नांदेड महापालिकेचा मालमत्ता कराचा लाखाचा आकडा कोटींवर

नांदेड महापालिकेचा मालमत्ता कराचा लाखाचा आकडा कोटींवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका स्थापनेनंतर मालमत्ताधारकांच्या सामान्य करात दिवसेंदिवस वाढ होत गेली असून १९८०-८१ मध्ये मालमत्ताकराची १९ लाख ६९ हजार रुपयांची एकूण मागणी असलेल्या महापालिकेची २०१७-१८ ची मालमत्ताकराची मागणी १८ कोटी ९१ लाखांवर पोहोचली आहे. शहरात सध्या जीआयएस कंपनीकडून मालमत्तांचे मूल्यांकन केले जात असून करामध्ये जवळपास ४० टक्के वाढ अपेक्षित आहे.
शहरात आजघडीला १ लाख ११ हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमताधारकांकडून १८ कोटी ९१ लाख रुपये सामान्य कराची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. शहरात सध्या फेरमूल्यांकनाचे काम महापालिकेने हाती घेतले असून जीआयएसकडून हे केले जात आहे. शहरात प्रतिदिन १ ते दीड हजार मालमत्ताचे मूल्यांकन केले जात आहे. या मूल्यांकनानंतर मालमत्तधारकांना कराच्या नोटीस बजावल्या जाणार आहेत.
महापालिका स्थापनेच्या प्रारंभी १९८०-८१ मध्ये शहरात २२ हजार १६८ मालमत्ता होत्या. त्यांच्याकडून १९ लाख ६९ हजार रुपये कर अपेक्षित होता. त्यानंतर शहरात मालमत्तेचे मूल्यांकनही १९८६-८७ मध्ये करण्यात आले. या मूल्यांकनानंतर शहरातील मालमत्ताची संख्या ही २६ हजार १९५ वर पोहोचली. त्यांच्याकडून ४८ लाख ९३ हजार रुपये मालमत्ताकराची मागणी करण्यात आली. १९९०-९१ मध्ये तिसरे फेरमूल्यांकन झाले. या मूल्यांकनात ६ हजार मालमत्तांची वाढ झाली. ३२ हजार २९७ मालमत्तांसाठी ७१ लाख ५ हजारांची सामान्य कर मागणी करण्यात आली होती. ९६-९७ मध्ये मालमत्ताधारकांकडून सामान्य करापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेची संख्याही १ कोटींच्या पुढे गेली. ३९ हजार ४२८ मालमत्ताधारकांकडून १ कोटी ८३ लाख ४९ हजार रुपये कर वसुली करण्यात आली. २००५-६ मध्येही फेर मूल्यांकन करण्यात आले. ६५ हजार २३३ मालमत्तांसाठी ६ कोटी ८४ लाख ९२ हजार आणि २०११-१२ मध्ये झालेल्या मूल्यांकनात मालमत्तांधारकांची संख्या ९७ हजार ९५९ वर पोहोचली. या मालमत्ताधारकांकडून १५ कोटी १० लाख ५८ हजार रुपये कराची मागणी करण्यात आली.
२०११-१२ नंतर आता शहरात सातव्यांदा फेरमूल्यांकन करण्यात येत आहे.
या फेरमूल्यांकनात करामध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे. ही वाढ नेमकी किती होईल, ते आता मालमताकरांच्या नोटीस हाती पडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. रेडी रेकनर दरानुसार करवाढ केली तर ती मोठी वाढ ठरणार आहे. महापालिकेला ४० टक्क्यांपर्यंत करवाढ करण्याचे अधिकार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता महापालिकेने सुचविलेल्या करवाढीला सत्ताधारी कितपत स्वीकारतील, हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
---
कर वसुलीत उत्कृष्ट काम; १३ कोटींचा विशेष निधी
नांदेड महापालिकेने कर वसुलीत उत्कृष्ट काम केल्यामुळे महापालिकेला राज्य शासनाने १३ कोटींचा विशेष निधी दिला आहे. २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये कर वसुलीसंदर्भात झालेल्या उत्कृष्ट कामाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली होती. गुरु-त्ता-गद्दीनंतर शहरातील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. महापालिकेचे आर्थिक स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत आहेत.आता महापालिकेला कर वसुलीशिवाय अन्य कोणताही मोठा स्त्रोत उरला नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कर वसुलीसाठी आपला मोर्चा वळविला आहे.

Web Title: Nanded Municipal Corporation's property tax is worth millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.