नांदेड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:52 AM2018-08-28T00:52:59+5:302018-08-28T00:53:23+5:30

उत्पन्नवाढीच्या चिंतेत असलेल्या महापालिकेने सोमवारी बैठक घेऊन कर वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरातील अवैध नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाईनंतर ते नियमित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

Nanded Municipal Corporation's Ruckus | नांदेड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

नांदेड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

Next
ठळक मुद्देकर वसुलीची मोहीम सुरु : खड्डे बुजविण्यासाठीही निधीची चणचण

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उत्पन्नवाढीच्या चिंतेत असलेल्या महापालिकेने सोमवारी बैठक घेऊन कर वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरातील अवैध नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाईनंतर ते नियमित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
महापालिकेचे स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त संतोष कंदेवार, प्रकाश येवले, गिता ठाकरे आदींची प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर चिंतन करण्यात आले. शहरात आज एखादा खड्डा पडला तर तो बुजविण्याची ताकद महापालिकेकडे उरली नाही. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर काम होणे अपेक्षित आहे. मात्र प्रलंबित देयकामुळे ठेकेदार कामासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असताना उत्पन्नवाढीसाठी कोणताही अधिकारी पुढाकार घेऊन काम करण्यास तयार होत नाही. क्षेत्रीय अधिकारीही नेमके काम काय करतात? असा प्रश्न स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी आता कार्यालयात नव्हे, तर शहरात फिरुन काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
महापालिकेचे मालमत्ताकराचे एकूण १७६ कोटी रुपयांचे वसुली उद्दिष्ट आहे. त्यातील अनधिकृत बांधकामावरील शास्ती वगळल्यास १०६ कोटी ८६ लाख रुपये मालमत्ता करापोटी महापालिकेला वसूल करावे लागणार आहेत.
३१ आॅगस्टपर्यंत शास्ती रक्कम शंभर टक्के माफ होणार आहे. तर कर सवलतही देण्यात येणार आहे. कर वसुलीसाठी झोननिहाय दत्तक अधिकारी नेमण्यात आले आहेत. या कर वसुलीत ज्या मालमत्ताधारकाकडे एक लाखापेक्ष अधिक कर तीन वर्र्षांपासून थकला आहे, अशा मालमत्ताधारकाची करवसुली प्राधान्याने केली जाणार आहे. कर न भरल्यास कारवाईचा बडगाही उगारला जाणार आहे.
शहरात एकूण मालमत्तांची संख्या आणि नळधारकांची संख्या यात मोठी तफावत आहे. शहरात असलेल्या अवैध नळधारकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरात २८, २९ आणि ३० आॅगस्ट रोजी अवैध नळजोडणी शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. गाळेधारकांकडील वसुलीही केली जाणार आहे. यासाठी दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.
महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणतीही नवीन कामे शहरात केली जात नाहीत. केलेल्या कामाची डागडुजीही होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

फेरमूल्यांकनापूर्वीच मागणीबिल वाटप
शहरात महापालिकेकडून मालमत्ताचे फेरमूल्यांकन केले जात आहे. काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने मालमत्ताकराच्या नोटिसा वाटप केल्या आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेरमूल्यांकनापूर्वी नोटिसा देवू नये अशी मागणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेने वाटप केलेली मागणीबिले ही जुन्या दराप्रमाणेच दिले असून फेरमूल्यांकनानंतर मालमत्ताधारकांना खास नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यावर मालमत्ताधारकांना आक्षेपही घेता येणार आहे. फरकाची रक्कम पुढील मागणी बिलात समाविष्ट करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वाढीव मालमत्ताकराच्या विषयावर नाशिक मनपाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. नांदेडमध्येही मालमत्ताकराच्या वाढीवरुन सदस्यांनीही न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
लवकरच संयुक्त बैठक
मनपा उत्पन्न वाढविण्यासाठी सोमवारी स्थायी समिती सभापतींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस महापौर शीलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले उपस्थित नव्हते. त्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच मनपाची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Nanded Municipal Corporation's Ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.