नांदेड महापालिकेतील इफ्तार पार्टी सोमवारमुळे रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:24 AM2018-06-05T00:24:03+5:302018-06-05T00:24:03+5:30

महापालिकेने सोमवारी आयोजित केलेली इफ्तार पार्टी अनेकांच्या नाराजीनंतर अखेर रद्दच करण्यात आली आहे. सोमवारी इफ्तार पार्टी कशी आयोजित केली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. ही बाब लक्षात घेत मनपाने इफ्तारचा कार्यक्रमच रद्द केला आहे.

Nanded municipal iftar party canceled due Monday! | नांदेड महापालिकेतील इफ्तार पार्टी सोमवारमुळे रद्द !

नांदेड महापालिकेतील इफ्तार पार्टी सोमवारमुळे रद्द !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेने सोमवारी आयोजित केलेली इफ्तार पार्टी अनेकांच्या नाराजीनंतर अखेर रद्दच करण्यात आली आहे. सोमवारी इफ्तार पार्टी कशी आयोजित केली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. ही बाब लक्षात घेत मनपाने इफ्तारचा कार्यक्रमच रद्द केला आहे.
महापालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. यावर्षीच्या इफ्तार पार्टीच्या आयोजनाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर इफ्तार पार्टीचा दिवसही ठरला. ४ जून रोजी इफ्तार पार्टी निश्चित करण्यात आली. मात्र मुस्लिम बांधव वगळता इतरांनी मात्र सोमवारी इफ्तार पार्टी कशी ठेवली? असा प्रश्न उपस्थित केला.
इफ्तारसह मांसाहारी भोजनही ठेवले जाते. मात्र काही जणांनी मांसहार वर्ज्य असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याच कारणावरुन महापालिकेने अखेर सोमवारची इफ्तार पार्टीच रद्द केली.
३ दिवसांपूर्वी इफ्तार पार्टीचा दिवस ठरवला होता. मात्र सोमवारच्या वाढत्या आक्षेपानंतर ही इफ्तार पार्टीच रद्द करावी लागली.
महापालिकेने आयोजित केलेली इफ्तार पार्टी अचानक रद्द केल्यानंतर पूर्वीच योग्य नियोजन का केले नाही, असा प्रश्न पुढे आला आहे. महापालिकेत इफ्तारचे आयोजन केल्याचा निरोप अनेकांना पोहोचला होता. मात्र कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे ऐनवेळी आलेल्या मुस्लिम बांधवांसाठी स्थायी समिती सभागृहात इफ्तारचे आयोजन केले होते. येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारीची व्यवस्था केली होती.
एकूणच महापालिकेच्या या नियोजनाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक कार्यक्रमाबाबत सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेणे आवश्यक होते. निर्णय घेतल्यानंतर पुन्हा त्यात बदल करणे ही बाब चुकीची असल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. त्याचवेळी सोमवारी इफ्तार पार्टी कशी ठेवली? असा प्रश्न काही नगरसेवकांनी प्रशासनाकडे उपस्थित केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
---
इफ्तार पार्टी लवकरच घेऊ-महापौर
सोमवारी आयोजित केलेली इफ्तार पार्टी अचानक रद्द केल्याबाबत महापौर शीलाताई भवरे यांची प्रतिक्रिया घेतली असता हा कार्यक्रम रद्द कशामुळे झाला याबाबत त्यांनी मौन बाळगले. मात्र इफ्तार पार्टी लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र ४ जूनचा कार्यक्रम रद्द का झाला याबाबत मात्र त्या ठामपणे काही सांगू शकल्या नाहीत. कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी आपल्याशी चर्चा केली नव्हती काय? यावरही त्यांनी मौन बाळगले. स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनीही यावर नाराजी व्यक्त केली.

Web Title: Nanded municipal iftar party canceled due Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.