नांदेड मनपा पदाधिकारी आज कोल्हापूरला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:20 AM2018-10-11T01:20:09+5:302018-10-11T01:20:23+5:30
सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात पूर्णत्वास आला असून येत्या २५ ते २६ तारखेपर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रित करण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी कोल्हापूरकडे रवाना होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात पूर्णत्वास आला असून येत्या २५ ते २६ तारखेपर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रित करण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी कोल्हापूरकडे रवाना होत आहे.
समाजव्यवस्थेत मानवता रुजविण्यासाठी अस्पृश्यता नष्ट करुन बहुजनांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे इतिहासात स्थान आहे. बहुजनांची अस्मिता म्हणूनही शाहू महाराजांची ओळख आहे. शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. अशा या महापुरुषाचा पुतळा नांदेडमध्ये उभारला जात आहे.
शहरात छत्रपती शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम २५ आॅक्टोबरपर्यत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. बुधवारी माजी राज्यमंत्री आ. डी. पी.सावंत, महापौर शीलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त लहुराज माळी, नगरसेवक उमेश चव्हाण, सुभाष रायबोले, विठ्ठल पाटील डक, किशोर भवरे, विरेंद्र कानोजी, संदीप सोनकांबळे, अनिकेत भवरे, कार्यकारी अभियंता गिरीष कदम आदींनी पाहणी केली. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही लवकरच घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यास छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना निमंत्रित केले जाणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीची वेळही निश्चित झाली असून त्यांच्या वेळेप्रमाणे उद्घाटन सोहळा निश्चित केला जाणार असल्याचे सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले. त्यामुळे आता छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन लवकरच होईल, हे निश्चित झाले आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी २०१३ पासून पाठपुरावा सुरु आहे. २०१३ मध्ये कृषी विद्यापीठाच्या जागेचे हस्तांतरण महापालिकेकडे आले. २०१४ मध्ये या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. चार वर्षानंतर का होईना हा पुतळा आता पूर्णत्वास गेला आहे.
महात्मा फुले दांपत्याच्या पुतळ्याचे कामही सुरु
शहरात आयटीआय महात्मा फुले चौकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे कामही जवळपास दहा वर्र्षांपासून रखडले होते. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे लहुराज माळी यांनी हाती घेतल्यानंतर या पुतळा कामाला गती मिळाली आहे. आवश्यक त्या सर्व परवानग्यांसह जागेचा वादही मिटविण्यात महापालिकेला यश आले आहे. या सर्व प्रक्रियेनंतर निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून प्रत्यक्षात पुतळा सुशोभिकरणाच्या कामासही प्रारंभ झाला आहे. हे कामही लवकरच होईल,अशी अपेक्षा आहे.