नांदेड मनपा स्थायीचे आठ सदस्य होणार निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:29 PM2018-11-25T23:29:53+5:302018-11-25T23:30:52+5:30
महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपत असून हे सदस्य कोणते ? ते सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपत असून हे सदस्य कोणते ? ते सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. चिठ्ठीद्वारे १६ पैकी ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत निघणा-या चिठ्ठ्यातील नावाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेड मनपाच्या स्थायी समितीची बैठक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत ९ विषय ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये आर्थिक देयकांच्या मंजुरीचे, कर्मचारी वेतनवाढ हे विषयही आहेत.
त्याचवेळी या बैठकीत निवृत्त होणारे आठ सदस्य कोणते ? याकडे लक्ष लागले आहे. स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, उमेश पवळे, माजी सभापती मसूद अहेमद खान, फारुखअली खान, सयद शेरअली, सतीश देशमुख, मोहिनी येवनकर, प्रशांत तिडके, अ. लतिफ अ. माजीद, भानुसिंह रावत, कांताबाई मुथा, गुरुमितसिंघ नवाब, ज्योत्स्रा गोडबोले या १५ काँग्रेस नगरसेवकांचा आणि वैशाली देशमुख या एका भाजपा नगरसेविकेचा स्थायी समितीत समावेश आहे. वर्षानंतर निवृत्त होणाºया आठ सदस्यांची नावे चिठ्ठीद्वारे काढली जाणार आहेत.
स्थायी समितीतील आठ रिक्त पदासाठीची नावे ही महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत घोषित केली जाणार आहेत.
त्याचवेळी विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष शमीम अब्दुल्ला यांच्या कार्यकाळातील ही शेवटचीच बैठक राहणार आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडेही लक्ष लागले आहे. निवृत्त होणाºया आठ सदस्यांसह या बैठकीत शहरातील बीओटी अंतर्गत प्रकल्पांची सद्य:स्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. भानुसिंह रावत आणि अ.लतिफ यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी बीओटी अंतर्गत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र त्या प्रकल्पाची वाटचाल संथगतीने सुरु असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
इमारत निरीक्षकांना देण्यात आलेल्या वेतनश्रेणीवरही स्थायी समितीने आक्षेप घेतला आहे. नियमबाह्यरित्या इमारत निरीक्षकांना वेतनवाढ दिल्याचा आरोप करण्यात आला असून यामध्ये सभागृहाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील अधिकाºयांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
रखडलेल्या दलितवस्ती निधीवरही चर्चा
महापालिकेला उपलब्ध झालेला दलितवस्ती निधी आतापर्यंत खर्च झाला नाही. परिणामी शहरातील अनेक दलित वस्त्या विकासापासून वंचित आहेत. याबाबत स्थायी समितीचे भानुसिंह रावत व अ. लतिफ यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. दलितवस्ती निधीअंतर्गत मागील दोन वर्षांची कामे रखडली आहेत. राजकीय तसेच प्रशासकीय अडथळ्यामुळे या कामांना मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. ही कामे रखडल्याने स्थानिक नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने काय कार्यवाही केली? दलित वस्ती अंतर्गतची कामे का रखडली? ही कामे कधी होणार? असे अनेक प्रश्न पुढे आले आहेत. त्यावर सोमवारी होणाºया स्थायी समितीत चर्चा केली जाणार आहे.
‘जीबी’ पुढे ढकलली ?
महापालिकेची सर्वसाधारण सभा २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत १३ विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये वजिराबाद भागातील व्यंकटराव तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्त्वावरील विकासाची निविदाही आहे. या सभेकडे लक्ष लागलेले असतानाच ही सभा पुढे ढकलावी, असे पत्र महापौरांनी दिले आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे.