नांदेड महापालिका रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:43 AM2018-05-25T00:43:16+5:302018-05-25T00:43:16+5:30
पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत शहरातील मोठे १७ नाले सोडल्यामुळे गोदावरीचे प्रदुषण होत आहे़ याबाबत पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून प्रदुषण नियंत्रण मंडळाने तो अहवाल महापालिकेला पाठवून यावर उपाययोजना करण्याची सुचना केली आहे़ त्यामुळे गोदावरी प्रदुषणाबाबत महापालिका पुन्हा एकदा रडारवर आली आहे़
शहरातील मलनिस्सारण प्रकल्प बंद असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गोदावरीत शहरातील सांडपाण्याचे १७ नाले थेट सोडण्यात येतात़ त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा झाला असून त्याला दुर्गंधीही सुटली आहे़ याबाबत पर्यावरण प्रेमींना अनेकवेळा निवेदनेही दिली़ परंतु त्याकडे दुर्लक्ष केले़ त्यात वर्षभरापूर्वी पालकमंत्री रामदास कदम यांनी गोदावरी नदीवरील घाटांना भेट देवून पाहणी केली होती़ यावेळी गोदावरीच्या प्रदुषणावरुन त्यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ व महापालिका या दोघांनाही धारेवर धरले होते़ तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाला पाण्याची तपासणीचे आदेश दिले होते़ या विषयाला वर्ष उलटल्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाला उशीरा का होईना शहाणपण सुचले आहे़ प्रदुषण नियंत्रण मंडळाने १ मे रोजी गोवर्धन घाट, शनी मंदिर, नगीनाघाट आदी परिसराची पाहणी करुन नाल्याच्या पाण्याचे नमुने घेतले होते़ या पाणी नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत़ त्यानुसार जिल्ह्यातील गोदावरी नदीचे ए-२ मध्ये वर्गीकरण आहे़ या पाण्याच्या पृथकरण अहवालाची ए-२ वर्गीकरणासाठी विहित केलेल्या मर्यादेशी तुलना केली असता, पाण्यातील बीओडी व सीओडीचे घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहेत़ गोदावरी नदीपात्राचे सर्वेक्षण केले असता, नाल्यामधील प्रक्रिया न केलेले सांडपाण्यामुळे गोदावरीतील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे़ त्यामुळे या प्रकरणात त्वरित उचित कार्यवाही करावी, असे पत्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मनपाला दिले आहे़ त्यामुळे नदीचे प्रदुषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या मनपाला प्रदुषण नियंत्रण मंडळाने हा आणखी एक दणका दिला आहे़
२२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे
महापालिकेने गोदावरीत मिसळणारे १७ नाल्यातील घाण पाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे़ हा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला़ या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर गोदावरील मिसळणाºया या घाण पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात ये आहे़ परंतु गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या कायम असून नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे़