नांदेड मनपा प्लास्टिकबंदीसाठी पुन्हा मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 07:42 PM2018-09-29T19:42:20+5:302018-09-29T19:43:04+5:30
शुक्रवारी व्यापाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़
नांदेड : प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर महापालिकेने शहरात धडक मोहीम राबवून अनेक व्यापाऱ्यांवर धाडी मारल्या होत्या़ यावेळी लाखो रुपयांच्या कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या़ परंतु, त्यानंतर प्लास्टिकबंदीचा महापालिकेला विसर पडला होता़ अनेक विक्रेतेही सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करीत होते़ त्यात आता मनपाला पुन्हा एकदा प्लास्टिकबंदीची आठवण झाली असून शुक्रवारी व्यापाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़
मनपा आयुक्त लहुराज माळी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले होते़ त्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली होती़ तसेच प्रभागात ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरुपात घ्यावा़ उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या सूचना माळी यांनी दिल्या होत्या़
त्यानुसार शुक्रवारी इंडिया गोळी बिस्कीट, स्वामी समर्थ किराणा या दुकानदारास प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला़ पांपटवार किराणा दुकानास दुसऱ्यावेळी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे दहा हजार रुपये दंड लावला़ क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शिंगे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली़ झोन क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग क्रमांक १५,१७ व १८ मध्ये सहा जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड लावण्यात आला़
त्यात कोहीनूर कलेक्शन, कबीर मेन्सवेअर, स्वीस बेकरी, किड्स क्लब, स्मार्ट लुक मेन्सवेअर, दीप कर्टन यांचा समावेश आहे़ तर उघड्यावर घाण करणाऱ्या दोघांकडून ६५० रुपये दंड वसूल केला़ शिवाजी डहाळे, गुलाम सादेक यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम तडवी, गोविंद थेटे, अतिख अन्सारी यांनी ही कारवाई केली़
दरम्यान, एवढे दिवस थंड पडलेली प्लास्टिकबंदीच्या विरोधातील मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली असून त्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत़
दरम्यान, प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेडातील अनेक विक्रेत्यांनी स्वत:हून कॅरिबॅग वापरणे बंद केले होते़ त्याचबरोबर नागरिकही कापडी पिशव्यांचा वापर करीत होते़ कॅरिबॅग बंदीच्या निर्णयामुळे कापडी पिशव्यांना चांगले दिवस आले आहेत़ महापालिकेलाही कापडी पिशव्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे़ परंतु, अद्यापही महापालिकेच्या पिशव्या बाजारात आल्याच नाहीत़ या पिशव्यावरुन मध्यंतरी राजकारण बरेच तापले होते़ त्यामुळे या पिशव्यांना विलंब लागत आहे़