नांदेड मनपातील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:10 AM2018-09-04T00:10:45+5:302018-09-04T00:11:36+5:30

Nanded Municipal staff | नांदेड मनपातील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सादर

नांदेड मनपातील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सादर

Next
ठळक मुद्देफेरबदल करुन दोन वर्षानंतर सादर

अनुराग पोवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पूर्वीच्या २ हजार ३२३ कर्मचाऱ्यांमध्ये ६२१ कर्मचाऱ्यांची वाढ होणार असून काही नवे पदेही निर्माण करण्यात आल्याची माहिती आयुक्त लहुराज माळी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
नांदेड महापालिकेचा कर्मचारी आकृतिबंध यापूर्वी ५ सप्टेंबर २०१५ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला होता. पदाधिकारी आणि अधिकारी वादातून या आकृतिबंधासंदर्भात अनेक तक्रारी शासनस्तरावर करण्यात आल्या होत्या. तत्कालीन महापौर आणि खासदारांनीही या आकृतिबंधासंदर्भात शासनाला २२ जानेवारी २०१६ रोजी पत्र लिहिले होते. त्यावर राज्य शासनाने २८ जानेवारी २०१६ रोजी नांदेड महापालिकेला एक पत्र लिहून खासदार आणि महापौरांच्या तक्रारीचा संदर्भ देत सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नांदेड महापालिकेच्या १० आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ६२ अन्वये कर्मचारी आकृतिबंधाच्या निर्मितीचे सर्व अधिकार महापौर आणि आयुक्तांना सोपविले होते. त्यानंतर या आकृतिबंधात सुधारणा सुरु होत्या. तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कार्यकाळात महापालिका कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध जवळपास निश्चित झाला होता. त्यात काहीअंशी सुधारणा करत विद्यमान आयुक्त लहुराज माळी यांनी कर्मचारी आकृतिबंध अंतिम केला आहे.
महापालिकेत सध्या २ हजार ३२३ अधिकारी-कर्मचारी आहेत. नव्या आकृतिबंधानुसार या संख्येत ६२१ ची भर पडणार आहे. नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेत एकूण २ हजार ९४४ पदे राहणार आहेत.
हा प्रस्ताव शासनाकडे रवाना करण्यात आला आहे. महापालिकेचा हा आकृतिबंध ३० सप्टेंबरपर्यत मंजूर करुन घेण्याचे प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. हा आकृतिबंध तयार करण्यासाठी उपायुक्त संतोष कंदेवार, गीता ठाकरे, विलास भोसीकर, विधि अधिकारी अजितपालसिंघ संधू, माधवी मारकड यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, महापालिकेच्या प्रस्तावित आकृतिबंधास महापालिका कामगार कर्मचारी युनियनने विरोध दर्शविला होता. राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या सेवाप्रवेश नियमात बदल केला जात असल्याचा व आकृतिबंध करताना संघटनेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशिष्ट अधिकाऱ्यांना हक्काची पदे पदोन्नतीने देण्यासाठी आणि वर्ग ४ ची अनेक पात्र कर्मचारी व मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून या प्रस्तावात शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. कर्मचारी संघटनेचा हा विरोध प्रशासनाने मोडून काढताना महापालिकेत पाच कर्मचारी संघटना आहेत.
कर्मचारी संघटनांना या संदर्भात विचारणा करावी असा कोणताही नियम नाही. त्यामुळे संघटनांना आकृतीबंधाबाबत विचारण्याचा प्रश्नच नाही. त्याचवेळी आकृतिबंधाच्या प्रस्तावाबाबत आयुक्तांना अंतिम मान्यतेचे अधिकार आहेत. त्यामुळे हा आकृतिबंध अंतिम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून तो शासन मान्यतेसाठी रवाना करण्यात आला आहे.

आकृतिबंधात नवीन ११ पदांची निर्मिती

  1. प्रस्तावित आकृतिबंधात ११ नवीन पदेही निर्माण करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुख्य माहिती व तंत्र अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी, स्वीय सचिव, कर अधीक्षक, कर निरीक्षक, वसुली लिपीक, सहायक नगररचनाकार, क्युरेटर, मैदान सहायक, उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक, मुख्य विधि अधिकारी, वृक्षसंवर्धन अधिकारी ही पदे निर्माण करण्यात आली आहेत.
  2. नांदेडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमची निर्मिती लक्षात घेऊन क्युरेटर आणि मैदान सहायक ही पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्याचवेळी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सहायक नगररचनाकार महापालिकेला आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  3. वृक्ष लागवडीचा उपक्रम महापालिका स्तरावर सातत्याने सुरु आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धन अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले आहे. तर कायदेविषयक प्रकरणाची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्य विधि अधिकारीही प्रस्तावित करण्यात आला आहे.
  4. एकूणच महापालिकेने नव्या पदाची निर्मिती करताना महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे याअनुषंगाने आकृतिबंध तयार केल्याचे आयुक्त माळी यांनी सांगितले. हा आकृतीबंध ३० सप्टेंबरपर्यंत मंजूर करुन घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Nanded Municipal staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.