नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:54 AM2018-04-11T00:54:58+5:302018-04-11T00:54:58+5:30

महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमकी कितीची वाढ होईल, हे येत्या काही दिवसांतच कळणार आहे.

Nanded municipality budget sanction | नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी

Next
ठळक मुद्देकोणतीही करवाढ नाही : उत्पन्नवाढीच्या विषयावर सदस्यांनी केली चर्चा, स्वेच्छा निधीमध्ये वाढ करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमकी कितीची वाढ होईल, हे येत्या काही दिवसांतच कळणार आहे.
महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली. या सभेत स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेनेही मंजुरी दिली. त्याचवेळी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करण्याचे अधिकारही सभागृहाने महापौरांना प्रदान केले.
महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या ७८० कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ६ कोटी ६५ लाखांची वाढ सुचवत ३१ मार्च रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर अर्थसंकल्प ४ एप्रिल रोजी झालेल्या सभेत सर्वसाधारण सभेत महापौर शीलाताई भवरे यांना सुपूर्द केला होता. अभ्यासानंतर १० एप्रिल रोजी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना सभागृहनेते गाडीवाले यांनी महापालिका प्रशासनाने मागील वर्षभरात केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला. या कामातून शहर प्रगतीकडे जात आहे. त्यामध्ये आयुक्त गणेश देशमुख यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. अजूनही उत्पन्नवाढीच्या विषयात वाव असल्याचे ते म्हणाले. नगररचना विभागाला सक्षम करताना महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही ते म्हणाले.
माजी महापौर अब्दुल सत्तार यांनीही उत्पन्न वाढीसाठी महापालिकेला प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे सांगितले. बीओटी तत्त्वावर महापालिकेने व्यापारी संकुलाचा विकास केल्यास उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
फारुख अलीखान, दीपक रावत, आनंद चव्हाण, सतीश देशमुख यांनीही चर्चेत सहभाग घेतला. तरोडा भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी देशमुख यांनी केली तर रावत यांनी आस्थापनेवरील वाढत्या खर्चावर बोट ठेवले.
नगरसेवकांना स्वेच्छा निधी अंतर्गत प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची तरतूद स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आली आहे. यामध्ये वाढ करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र आयुक्त देशमुख यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता ही वाढ करता येणार नसल्याचे सांगितले.
दहा लाखांच्या स्वेच्छा निधीस सभागृहाची मंजुरी असेल तर एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम देण्यात येईल आणि दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये वितरित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वेच्छा निधीसाठी जवळपास ९ ते १० कोटी रुपये अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर विनय गिरडे, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, संभाजी वाघमारे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू आदींची उपस्थिती होती.

श्री गुरूगोविंदसिंघजी जयंतीसाठी केवळ एक हजार !
सोमवारी सर्वसाधारण सभेपुढे सादर झालेल्या अर्थसंकल्पात सामाजिक सेवा सुविधांअंतर्गत विविध कार्यक्रमांसाठी ३७ लाख ६१ हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये श्री गुरूगोविंदसिंघजी जयंती सोहळा कार्यक्रमासाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही बाब नगरसेविका गुरुप्रीतकौर सोडी यांनी निदर्शनास आणून देताना श्री गुरूगोविंदसिंघांची नगरी म्हणून नांदेडची ओळख आहे. हजारो कोटी रुपये श्री गुरुगोविंदसिंघांच्या नावाने निधी येत आहे. असे असताना महापालिकेने श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीसाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करणे ही बाब निषेधार्ह असल्याचे सांगितले. स्थायी समिती सभापतींचा त्यांनी निषेध केला. शेवटी सभागृहाने या कार्यक्रमासाठी निधीची तरतूद वाढवून द्यावे, असा निर्णय घेतला.

Web Title: Nanded municipality budget sanction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.