नांदेड मनपात मजुरांचे वारस लिपीक पदावर; आयुक्तांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 12:52 PM2017-12-11T12:52:01+5:302017-12-11T12:54:33+5:30
औरंगाबाद महापालिके - पाठोपाठ नांदेड महापालिकेतही मजुरांच्या वारसांची थेट लिपीक पदावर नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या नियुक्त्या देताना लाड-पागे समितीच्या शिफारशीकडे साफ कानाडोळा करण्यात आला़ या प्रकरणात आता आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़
नांदेड: औरंगाबाद महापालिके - पाठोपाठ नांदेड महापालिकेतही मजुरांच्या वारसांची थेट लिपीक पदावर नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या नियुक्त्या देताना लाड-पागे समितीच्या शिफारशीकडे साफ कानाडोळा करण्यात आला़ या प्रकरणात आता आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़
सफाई कामगारांच्या रिक्त झालेल्याच जागेवर त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याची प्रचलित शासन नियमात तरतुदी असताना आस्थापना विभागाने २००९-१० या कालावधीत एकूण ९ उमेदवारांना थेट वर्ग- ३ च्या लिपीक या पदावर नियुक्ती दिल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे़ औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेत अशाच प्रकारे लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या करताना झालेल्या अनियमिततेची शासनाने ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यामार्फत चौकशी केली होती़
तक्रारीत तथ्य असल्याचा निष्कर्ष निघाल्यानंतर उपायुक्तापासून संचिका हाताळणा-या सर्व लिपीकाविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात आली़ नांदेडातही तसाच प्रकार उघडकीस आला़ नांदेड महापालिकेत नऊ वारसांना थेट लिपीक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे़ या प्रकरणात आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशीसाठी मुख्य लेखा परीक्षक रावसाहेब कोलगने यांची निवड केली आहे़ त्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे़ या प्रकरणात तत्कालीन आस्थापनेवरील लिपीक, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक आयुक्त व उपायुक्त हे चौकशीच्या फे-यात येण्याची शक्यता आहे़ त्याचबरोबर भरत्यामध्ये अशा प्रकारचे आणखी काही घोटाळे झाले का? हे तपासून पाहण्याचीही गरज आहे़