नांदेड महापालिकेच्या नदीघाट स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा
By शिवराज बिचेवार | Published: September 6, 2022 06:50 PM2022-09-06T18:50:59+5:302022-09-06T18:51:21+5:30
स्वच्छता कर्मचारी वगळून जवळपास दोनशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहिमेत सहभाग घेतला होता.
नांदेड : येत्या शुक्रवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार असून, नदीघाट स्वच्छ असावेत या उद्देशाने आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या संकल्पनेतून महापालिकेने तीन दिवसांची नदी घाट स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी गोवर्धन घाट, बंदाघाट, नगिना घाट आणि शनी घाटाची स्वच्छता करण्यात आली.
शहरातील सांडपाण्याचे सर्व नाले गोदावरीत सोडण्यात येतात. त्यामुळे पाणी प्रदूषित झाले असून, नदीकाठी दुर्गंधी पसरली आहे. त्यात येत्या शुक्रवारी गणरायांचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे या काळात नदीघाट स्वच्छ राहावेत, असा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे.
मंगळवारी पहिल्या दिवशी स्वच्छता कर्मचारी वगळून जवळपास दोनशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहिमेत सहभाग घेतला होता. सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत हे अभियान राबविण्यात आले. ७ सप्टेंबर राेजी पासदगाव, सांगवी आणि आसना नदी घाटावर स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेत पर्यावरणप्रेमी नागरिक, एनजीओ, गणेश मंडळाचे सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.