रस्त्यावर थांबलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट, ट्रक चालक जळून खाक; नांदेडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:07 PM2022-03-27T18:07:04+5:302022-03-27T18:07:23+5:30
शनिवारी मध्यरात्री एक वाजता घटना घडली असून, आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.
नांदेड: रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला रात्री उशिरा अचानकपणे आग लागल्याने कॅबीनमधील 30 वर्षीय ट्रक चालक जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 26 मार्च रोजी मध्यरात्री एक वाजेच्यादरम्यान नवीन नांदेड भागातील हनुमान मंदिराच्या बाजुला नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावर घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाळदा (ता. कंधार) येथील रहिवासी असलेले ट्रक चालक नितीन सटवाजी कांबळे व त्यांच्या सोबतचा सहकारी ट्रक चालक रमेश लालु वाघमारे 26 मार्च रोजी गोंदिया येथून त्यांच्या (एमएच-40, बीजी-9604) या ट्रकमध्ये तांदूळ घेवून नांदेडमार्गे लातुरकडे जात होते. यावेळी त्यांनी नवीन नांदेड परिसरातील बिजली हनुमान मंदिराजवळ रात्री नऊ वाजेच्यादरम्यान ट्रक थांबवली. त्यानंतर रमेश लालु वाघमारे त्यांच्या घरी जेवणासाठी गेले. ट्रक चालक नितीन कांबळे हे ट्रकमध्येच झोपले होते.
जेवण झाल्यानंतर रमेश वाघमारे मध्यरात्री एक वाजता ट्रककडे आले असता त्यांना ट्रक पूर्णपणे जळालेली दिसली. विशेष म्हणजे, ट्रक चालक रमेश वाघमारे हे ट्रकजवळ येण्याअगोदर ट्रक जळाल्याची माहिती अग्निशामक दलास भेटल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकला लागलेली आग विझवली होती. दरम्यान, रमेश वाघमारे यांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये जावून पाहिले असता, त्यांना सहकारी ट्रकचालक नितीन कांबळे हे पुर्णपणे जळून खाक झालेले दिसले.
ट्रकला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, कॅबीनमधील गॅस तथा स्टोव्हचा अचानक भडका होवून ही आग लागली असावी, अन् या आगीतच गंभीरपणे भाजल्याने ट्रकचालक नितीन कांबळे यांचा अंत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज प्र. पो.नि. अशोक घोरबांड यांनी 'लोकमत'शी बोलताना वर्तविला आहे. याप्रकरणी मयताचे भाऊ प्रताप सटवाजी कांबळे (रा.हळदा) यांनी दिलेल्या अर्जाच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार शेख जावेद हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.