मध्यप्रदेशात मुलींची विक्री करणारा फरार आरोपी नांदेडात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 07:30 PM2019-01-11T19:30:59+5:302019-01-11T19:31:40+5:30
या टोळीतील तिघांना आतापर्यंत अटक झाली असून राजस्थानचे आणखी दोघे फरार आहेत़
नांदेड :गरीब घरातील मुलींच्या कुटुंबियांना पैशाचे आमिष दाखवून मध्यस्थामार्फत त्यांची मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये विक्री करणाऱ्या टोळीतील एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत़ या टोळीतील तिघांना आतापर्यंत अटक झाली असून राजस्थानचे आणखी दोघे फरार आहेत़
ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून मुलींची मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये विक्री करणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत होती़ २०१७ मध्येच या टोळीचे बिंग फुटले होते़ त्यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती़ तर तिघे जण फरारच होता़ या तिघातील मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील विठ्ठल दत्तरामजी राखोंडे (४०) हा मध्यस्थ दोन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि़सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद दिघोरे, पोउपनि सदानंद वाघमारे, पोना़राजू पांगरेकर, बालाजी सातपूते, तानाजी येळगे, शेख जावेद, विजय आडे, सपोउपनि शाहू, रमेश खांडे, दारासिंग राठोड, घुंगरुसिंग टाक यांच्या पथकाला आरोपीची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती़ त्यानंतर नांदेड शहरातील डाक कार्यालयाजवळ थांबलेला होता़ स्थागुशाने त्याच्या मुसक्या आवळत विचारपूस केली असता, त्याने साथीदारांच्या मदतीने आमदरी येथील एका मुलीची मध्यप्रदेशातील शेळगाव येथे विक्री केल्याचे सांगितले़ या प्रकरणात आरोपींविरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे़ परंतु गुन्हा नोंद झाल्यापासून तो फरारच होता़ या आरोपीला पुढील तपासासाठी भोकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़