नांदेड बलात्कार प्रकरणात मौलानाला सहा दिवसांची पोलिस कोठडी; माजलगांवच्या तिघांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:33 PM2018-01-19T18:33:52+5:302018-01-19T18:34:40+5:30
शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात मौलाना साबेर फारुखी याला गुरुवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती़ शुक्रवारी सायंकाळी मौलानाला न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ तर माजलगांव येथील तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली़
नांदेड : शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात मौलाना साबेर फारुखी याला गुरुवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती़ शुक्रवारी सायंकाळी मौलानाला न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ तर माजलगांव येथील तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली़
चुनाभट्टी भागात शिक्षण घेणार्या माजलगांव येथील अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी मौलाना साबेर फारुखीवर इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली होती़ त्यानंतर पोलिसांनी मौलानाला सहकार्य करणार्या माजलगांव येथील तिघांना उचलले होते़ याच दरम्यान, मौलानाच्या विरोधात विनयभंगाचे आणखी दोन गुन्हे दाखल झाले़ गुन्हा दाखल झाल्यापासून मौलाना फरारच होता़ त्याच्या तपासासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती़ तर दुसरीकडे माजलगांव येथील नवाब पटेल, इद्रीस पाशा आणि खलील गणी पटेल या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती़
गुरुवारी नांदेड पोलिसांनी मौलानाला औरंगाबाद येथून अटक केली होती़ शुक्रवारी सुरुवातीला माजलगांव येथील तिघांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली़ त्यानंतर सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मौलानाला न्यायालयात हजर करण्यात आले़ यावेळी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ न्या़एस़आऱजगताप यांच्यापुढे मौलानाला हजर करण्यात आले़ यावेळी न्या़जगताप यांनी मौलानाला २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़
न्यायाधीशांपुढे मौलाना निरुत्तर
न्या़एस़आऱजगताप यांच्यापुढे मौलाना साबेर फारुखी याला हजर करण्यात आले़ यावेळी न्या़जगताप यांनी मौलानाला तुम्हाला काही बोलायच आहे का? असा प्रश्न केला़ परंतु मौलानाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते़ न्यायाधीशांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला़ त्यावर मौलानाला मुझे फसाया गया है? असे उत्तर दिले़ त्यावर न्या़जगताप यांनी पुन्हा किसने फसाया? असा प्रश्न केला़ या प्रश्नावर मात्र मौलाना निरुत्तर झाला़ तुमचा कोणी वकील आहे का? या प्रश्नावर मौलानाने माझ्याकडून कोणीच नसल्याचे सांगितले़ विशेष म्हणजे मौलानाचे वकीलपत्र घेण्यासाठी कुणीही पुढे न आल्यामुळे न्यायालयानेच मौलानाला वकील दिला़
मौलानावर फेकली चप्पल
मौलानाला न्यायालयात आणण्यात येणार असल्याची माहिती होताच न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली होती़ त्यामुळे पोलिसांनी मौलानाला मागील प्रवेशद्वारातून न्यायालयात आणले़ यावेळी मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता़ मौलानाला पोलिस कोठडीत घेवून जात असताना, जमावातील एकाने मौलानावर चप्पल भिरकाविली़ प्रसंगावधान राखून पोलिसांनी तातडीने मौलानाला घेवून पोलिस वाहन गाठले.