नांदेडचे रस्ते अंधारात; महावितरणच्या थकबाकी मोहिमेचा शहराला झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:31 PM2018-03-14T18:31:56+5:302018-03-14T18:32:42+5:30
नांदेड शहरातील पथदिव्यांना बसल्याने अख्खे शहर काळोखात बुडाले आहे. पाच कोटी 94 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी महावितरणने ही कारवाई केली आहे.
नांदेड : नांदेड शहरातील पथदिव्यांना बसल्याने अख्खे शहर काळोखात बुडाले आहे. पाच कोटी 94 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी महावितरणने ही कारवाई केली आहे.
नांदेड महापालिकेच्या 681 कनेक्शनद्वारे पथदिव्यांना महावितरणच्या वतीने वीजपुरवठा केला जातो. या 681 कनेक्शनची जानेवारी 2018 अखेर एकूण पाच कोटी 94 लाख रुपयांची थकबाकी जमा आहे. या थकबाकी मध्ये जवळपास एक कोटी 44 लाख रुपयांच्या व्याजाचाच समावेश आहे. महानगरपालिका चालू देयक भरत असली तरी वाढती थकबाकी लक्षात घेता महावितरणने वीज पुरवठा खंडित करणेच पसंत केले आहे. मार्च अखेर थकबाकीपैकी किमान एक कोटी दोन लाख रुपये तरी महापालिकेने भरणे अपेक्षित आहे, त्याशिवाय पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही अशी भूमिका महावितरण घेतली आहे.
महावितरणच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या क्रमांक एक उपविभागामध्ये 251 कनेक्शन असून त्यांच्याकडे दोन कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी आहे तर उपविभाग क्रमांक दोन मध्ये 338 कनेक्शन असून दोन कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे. तसेच एमआयडीसी उपविभागामध्ये 92 पथदिव्यांचे कनेक्शन असून त्यांच्याकडे आठ कोटी सहा लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणला मार्च अखेरचे लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या पथदिव्यांची थकबाकी वसूल होणे गरजेचे आहे. त्यामुळे पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्या शिवाय महावितरण पुढे कोणताही पर्याय उरलेला नाही.
पथदिव्यांच्या थकबाकीपोटी नायगाव पालिकेने भरले 11 लाख रूपये
नायगाव नगर पालिकेकडे असलेल्या दोन कोटीच्या थकबाकी पोटी वीजपुरवठा खंडीत करताच पालिका प्रशासनाच्यावतीने आज रोजी 11 लाख रूपयांचा धनादेश महावितरणच्या सुपूर्द केला. 13 कनेकशन द्वारे पथदिव्यांना वीजपुरवठा केला जातो. यापुर्वी मागील तीन महिन्यात 20 लाख रूपयांचा भरणा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र थकबाकी शिवाय यावर्षीची मागणी 30 लाख रूपयांची असल्याने महावितरणसमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे आहे.