थोडक्यात महत्त्वाचे नांदेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:30+5:302021-06-11T04:13:30+5:30
नांदेड : जुन्या नांदेडसह इतर ठिकाणी अवैध धंदे सुरू असून, या भागातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी ...
नांदेड : जुन्या नांदेडसह इतर ठिकाणी अवैध धंदे सुरू असून, या भागातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी उपमहापाैरांसह नगरसेवकांनी केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सट्टा, जुगार, मटका, गुटखा आदींचे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंदे चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कॉलेजसमोरील दुभाजक काढावे
नांदेड : शहरातील कलामंदिर ते वजिराबाद या मुख्य रस्त्यावरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या समोरील दुभाजक काढण्याची मागणी शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे. दुभाजकामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने चर्चासत्र
नांदेड : जिल्हा माहेश्वरी महिला संघटन व राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने कोविड तथा ब्लॅक फंगस चर्चासत्र पार पडले. या वेळी डाॅ. दीपिका मुंदडा, डाॅ. प्रीतम चांडक, डाॅ. गाेविंद मंत्री, डाॅ. अनुप गिल्डा, डाॅ. मनिष दागडिया यांनी सहभाग नाेंदविला. यशस्वितेसाठी गीता झंवर, प्रतिभा राठी, डाॅ. ममता करवा, अनसूया मालू, पल्लाेड आदींनी परिश्रम घेतले.
नाल्या तुंबल्या
नांदेड : सिडको परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्या मागील काही दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत असून, पावसामुळे नाल्यांतील कचरा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अध्यापकांची पदे भरा
नांदेड : शासनाने उच्च शिक्षण संस्थेतील अध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी डाॅ. डी. एन. मोरे यांनी केली. नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी प्रा. डाॅ. परमेश्वर पाैळ, प्रा. सुरेश देवढे पाटील, प्रा. प्रमोद तांबे यांची उपस्थिती होती.
कविता अनुपमच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन
नांदेड : डाॅ. अनुपमा कोटलवार यांनी लिहिलेल्या कविता अनुपमाच्या या कविता संग्रहाचे प्रकाशन पंडित पाटील बेरळीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आनंद पुपलवाड, डाॅ. प्रशांत कोटलवार, एल. डी. झगे, किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अमाेली कोटलवार हिने केले. सूत्रसंचालन डाॅ. स्नेहल लाभसेटवार यांनी केले.
नागरिकांची गर्दी
नांदेड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून सुरू केलेले लाॅकडाऊन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी सोमवारी शिथिल केले. त्यानंतर शहरात नागरिकांची गर्दी वाढली आहे. विशेषत: तरोडा नाका, छत्रपती चाैक, भावसार चाैक या भागांत नागरिकांची गर्दी वाढली आहे.
दरवाढीचा निषेध
नांदेड : देशात कोरोनाने थैमान घातले असताना खते, पेट्रोल, डिझेल, गॅस, बी-बियाणांच्या तसेच खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीचा निषेध जनता दल सेक्युलरच्या वतीने करण्यात आला. या वेळी डाॅ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डाॅ. किरण चिद्रावार आदी उपस्थित हाेते.