नांदेडात गोदावरी पात्रातील सक्शन पंप जिलेटीनने उडविला; महसूल विभागाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:46 PM2019-04-22T18:46:02+5:302019-04-22T18:46:07+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नांदेड तहसीलदारांची कारवाई

In Nanded suction pump busted by Revenue Department's Action at Godavari basin | नांदेडात गोदावरी पात्रातील सक्शन पंप जिलेटीनने उडविला; महसूल विभागाची कारवाई 

नांदेडात गोदावरी पात्रातील सक्शन पंप जिलेटीनने उडविला; महसूल विभागाची कारवाई 

Next

- अनुराग पोवळे 

नांदेड : गोदावरी नदीतून कोणतीही परवानगी न घेता थेट सक्शन पंपाचा वापर करुन वाळू उपसा सुरू असल्याची बाब कळाल्यानंतर नांदेड तहसील प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारा सक्शन पंप जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने उडवूनच टाकला. मराठवाड्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध पहिलीच अशी बेधडक कारवाई झाली आहे.

तालुक्यातील राहेगाव येथे गोदावरी नदीत सक्शन पंप टाकून वाळू उपसा केला जात होता. याबाबत नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांना तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची शहानिशा करताना नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तहसीलदार २१ एप्रिल रोजी राहेगाव येथे पोहोचले. हे पथक गावात दाखल होताच गोदापात्र परिसरात सामसूम पसरली. राहेगाव येथे एक सक्शन पंप गोदावरी नदीत बसवलेला आढळला.  या पंपाद्वारे वाळू उपसा करुन त्याची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. ही वाहतूक दिवसा न होता रात्री सुरू होती. गोदावरी काठावर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसाठी धक्काही तयार करण्यात आला होता. 

नायब तहसीलदार काकडे यांनी सदर बाब नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांना कळविली. गोदावरी पात्रात सक्शन पंप असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनाही सदर प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यावेळी सदर ठिकाणी वापरण्यात येणारा सक्शन पंप नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले. या कारवाईदरम्यान स्वत: तहसीलदार अंबेकर हे घटनास्थळी पोहोचले. राहेगाव येथे पोलीस बंदोबस्तही बोलावण्यात आला होता. गोदावरी पात्रात असलेल्या सक्शन पंपावर जिलेटीन कांड्या लावण्यात आल्या. या कांड्यांचा स्फोट घडवत सदर सक्शन पंप पूर्णपणे नष्ट करण्यात आला. 

ते फोन कोणाचे ?
राहेगाव येथे नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाने सक्शन पंप जप्त केल्याची कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना मोबाईलद्वारे अनोळखी नंबरवरुन मोबाईलद्वारे सदर प्रकरणाकडे कानाडोळा करावा, असे सांगण्यात येत होते. ते फोन नेमके कोणाचे होते, वाळूमाफियांना कोणाचे पाठबळ होते, याचा पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: In Nanded suction pump busted by Revenue Department's Action at Godavari basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.