नांदेडात २९ जणांना चक्क तहसीलच पुरविते अफू, प्रत्येकाचा कोटा ठरलेला; अफू आणण्यासाठी कर्मचारी नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 11:26 AM2021-11-24T11:26:24+5:302021-11-24T11:28:09+5:30
नांदेड तहसील कार्यालयाकडे २९ जणांना अफूचे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना देण्यात आल्याची नोंद आहे. दर महिन्याला त्यांच्यासाठी साडेतीनशे डबी अफू मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणला जातो.
शिवराज बिचेवार -
नांदेड :नांदेडात सोमवारी एनसीबीने अफूच्या अड्ड्यावर धाड मारून मुद्देमाल जप्त केला. मात्र, नांदेड शहरात २९ परवानाधारक अफू घेणारे असून, त्यांना तहसील कार्यालयाकडूनच दर महिन्याला ठरावीक कोट्याची अफू पुरविली जात असल्याचे समोर आले आहे.
नांदेड तहसील कार्यालयाकडे २९ जणांना अफूचे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना देण्यात आल्याची नोंद आहे. दर महिन्याला त्यांच्यासाठी साडेतीनशे डबी अफू मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणला जातो. एका डबीत पाच ग्रॅम अफूच्या गोळ्या असतात. त्यासाठी अगोदर परवानाधारकाकडून ठरावीक रक्कम भरून घेतली जाते. त्या रकमेचे चलान करून ती मागविण्यात येते. त्यानंतर तहसील कार्यालयातूनच त्याचे वाटप होते. या सर्व वाटपाची नोंद केली जाते. त्यावर खरेदीदार आणि त्यापुढे तहसीलदारांची स्वाक्षरी असते.
हे २९ परवानाधारक हे अफूच्या आहारी गेले आहेत. वेळेवर अफू न मिळाल्यास ते अस्वस्थ होतात. त्यामुळे तहसील कार्यालयाला त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. पूर्वी ही संख्या शंभराहून अधिक होती. ती आता २९ वर आली आहे. नव्याने मात्र कुणालाही अफूचा परवाना दिला जात नसल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगितले.
अफू परवानाधारकांची दरवर्षी जिल्हा शल्य चिकित्सकाकडून तपासणी करण्यात येते. त्यांच्या शरीरासाठी अफू का गरजेचे आहे, याचा अहवाल दिला जातो. त्यानंतरच त्या परवानाधारकाला ती अफीम मिळते.
अफू आणण्यासाठी कर्मचारी नियुक्त
दर महिन्याला मुंबईहून अफू आणण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत एक राज्य उत्पादन शुल्कचा एक गार्ड असतो. अफू आणणे खूप जिकिरीचे काम असल्यामुळे हा कर्मचारी मुंबईला कधी जाणार याबाबत गोपनीयता बाळगली जाते.