Nanded: ७ मजुर महिला लोटल्या गेल्या ८० फूट खोल ‘मृत्यूच्या विहिरी’त; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:17 IST2025-04-05T15:16:51+5:302025-04-05T15:17:02+5:30
Nanded Tractor Accident: घटना नांदेडमध्ये, मयत हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावचे रहिवासी

Nanded: ७ मजुर महिला लोटल्या गेल्या ८० फूट खोल ‘मृत्यूच्या विहिरी’त; नेमकं काय घडलं?
नांदेड : शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह ८० फूट खोल विहिरीत पडून सात महिलांचा बुडून मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. जवळपास पाच तासांच्या प्रयत्नानंतर ट्रॅक्टर अन् मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.
घटनास्थळी नातेवाइकांचा आक्रोश, किंकाळ्यांचा आवाज मन सुन्न करणारा होता. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात दगडू शिंदे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील कामासाठी गुंज गावातील महिला नेहमीच कामाला येतात. शुक्रवारी सदर शेतमजूर महिलांना शिंदे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने त्यांच्या गड्याचा मुलगा नागेश आवटे हा घेऊन येत होता. ट्रॅक्टर शिंदेच्या शेतात पोहोचल्यानंतर एका धुऱ्यावरून दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर नेत असताना चारीच्या खड्ड्यात ट्रॅक्टरचे हेड अडकले. वेगाने ट्रॅक्टर काढण्याव्या प्रयत्नात त्याचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर ट्रॉलीसह जवळपास ८० फूट खोल विहिरीत काेसळले. चालकाने मात्र उडी मारून धूम ठाेकली.
या घटनेत ट्रॉलीमध्ये असलेल्या ९ महिला आणि १ पुरुषापैकी तिघांचे प्राण वाचले. परंतु, सात महिला ट्रॉलीच्या खाली दबून पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ताराबाई सटवाजी जाधव (वय ३५), सरस्वती लखन बुरूड (वय २५), चऊतराबाई माधव पारधे (वय ४५), सपना उर्फ मीना राजू राऊत (वय २५), ज्योती इरबाजी सरोदे ( वय ३०), धुरपता सटवाजी जाधव (वय १८), सीमरन संतोष कांबळे (वय १८) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये पार्वतीबाई रामा बुरूड (वय ३५), पुरभाबाई संतोष कांबळे (वय ४०), सटवाजी जाधव (वय ५५ वर्षे) या तिघांचा समावेश आहे. तर चालक नागेश आवटे हा फरार आहे.
बाप वाचला, माय-लेकीला मृत्यूने गाठले
सदर घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज या गावातील एकाच गल्लीतील सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात स्मशान शांतता पसली, तर घटनास्थळी हजारो नागरिकांची गर्दी जमली होती. ट्रॅक्टरमध्ये सटवाजी जाधव व त्यांच्या पत्नी ताराबाई आणि मुलगी धुरपता होत्या. ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर मोटारीचा पाइप आणि दोरीच्या साहाय्याने सटवाजी हे वर आले. मात्र, त्यांच्या पत्नी आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला.
पीएमओ, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर पीएमओ कार्यालयानेदेखील घटनेबद्दल संवेदना व्यक्त करत प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.