ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ कष्टकरी महिलांचा बुडून अंत; तिघांचे असे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:57 IST2025-04-05T14:56:32+5:302025-04-05T14:57:30+5:30
Nanded Tractor Accident: या घटनेमुळे आलेगाव, गुंजसह परिसरातील गावांमध्येदेखील स्मशानशांतता पसरली आहे.

ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ कष्टकरी महिलांचा बुडून अंत; तिघांचे असे वाचले प्राण
नांदेड : टीचभर पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या अन् कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी हातभार लावणाऱ्या कष्टकरी महिलांचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला. कधीच कष्टाला न जुमानणाऱ्या, प्रामाणिकपणे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी भल्या पहाटे रानात निघालेल्या सात महिलांच्या मृत्यूने अख्खे गाव सुन्न झाले असून, या घटनेमुळे आलेगाव, गुंजसह परिसरातील गावांमध्येदेखील स्मशानशांतता पसरली आहे. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत ट्रॉलीसह ट्रॅक्टर कोसळून सात महिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे. तर विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पण, ट्रॉलीखाली अडकलेल्या सात जणींचा बुडून मृत्यू झाला.
आलेगाव येथील शेतकरी दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या मालकीच्या शेतात गुंज येथील शेतमजूर महिला, पुरुष कामाला येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पहाटेच्या वेळी अधिक काम होईल अन् चार पैसे लागून येतील, या अपेक्षेने महिला मजूर उपाशीपोटीच रानात दाखल होत आहेत. शुक्रवारी पहाटे शिंदे यांच्या कामावर असलेल्या नागेश आवटे याने गुंज गावातून महिलांना ट्रॅक्टरमध्ये घेतले. गुंजपासून काही मिनिटांच्याच अंतरावर असलेल्या शिंदे यांच्या शेतात मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर साडेसात वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. दरम्यान, विहिरीलगत असलेल्या चारीतून ट्रॅक्टर वर काढून दुसऱ्या शेतात नेताना हा अपघात झाला अन् होत्याचे नव्हते झाले. ट्रॅक्टर कंट्रोल होत नाही हे लक्षात येताच चालक नागेश आवटे याने उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. पण, दहा जणांसह ट्रॅक्टरच्या हेडसह ट्रॉली विहिरीत कोसळली. कॅनॉलला पाणी येऊन गेल्याने ८० फूट खोल विहिरीत जवळपास ४० फूट पाणी होते. त्यामुळे हेडसह ट्रॉली पूर्णपणे विहिरीत बुडाली. सर्व जण ट्रॉलीच्या खाली अडकले. त्यावेळी दोन महिला अन् एका पुरुषाच्या हाती विहिरीतील मोटारीचा पाइप लागला. त्याचा आधार घेत ते मदतीसाठी धावा करीत होते. त्यावेळी घटनास्थळी धाव घेतलेल्या शेतकरी, ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे प्राण वाचविता आले. पण, पाण्यात बुडालेल्या सात महिलांचा जीव त्यांना वाचविता आला नाही.
हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली...
ट्रॅक्टरच्या हेडची समोरील दोन्ही चाके वर झाली आणि काही कळायच्या आत ट्रॉलीसह मजूर महिला विहिरीत कोसळल्या. प्रत्येकाने आपला जीव वाचविण्यासाठीची धडपड केली. त्यात पार्वती बुरड यांच्या हाती पाइप लागला अन् त्यांनी लगेचच आपली जाऊ सरस्वतीचा धावा करीत तिला आवाज दिला, तिने हातही दिला. पण, तो निसटला अन् सरस्वती बुडून तिचा मृत्यू झाला. या दोन्ही जावांसोबत सासू कांताबाई बुरड दररोज कामाला येत असतात. पण, शुक्रवारी त्यांना वसमतला जायचे असल्याने त्या घरीच थांबल्या. या अपघातापासून त्या बचावल्या असल्या तरी सुनेच्या मृत्यूने त्या पुरत्या खचल्या आहेत. तान्हुल्यासह तीन लेकरं सोडून गेलेल्या सरस्वतीच्या मृत्यूने कांताबाईचे अश्रू थांबत नव्हते.