Nanded Accident: विहिरीत ट्रॅक्टर झाले गडप, तब्बल सहा तास चालले रेस्क्यू ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:22 IST2025-04-05T14:22:36+5:302025-04-05T14:22:47+5:30
Nanded Tractor Accident: ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाचे अथक प्रयत्न

Nanded Accident: विहिरीत ट्रॅक्टर झाले गडप, तब्बल सहा तास चालले रेस्क्यू ऑपरेशन
नांदेड : मजुरांना घेऊन निघालेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह तुडुंब भरलेल्या विहिरीत गडप झाले. या अपघातात बचावलेल्या मजुराने आरडाओरड केल्यावर लगतच्या ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, नांदेड येथून राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून रेस्क्यू मोहीम राबवीत अपघातग्रस्त वाहन व त्याखाली अडकलेल्या सात महिलांचे मृतदेह बाहेर काढले. तब्बल सहा तास चाललेल्या या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थांनी बचावकार्यात प्रशासनाच्या बरोबरीने सहभाग नोंदवला.
विहिरीत ट्रॅक्टर पडून त्यातील महिला बुडाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळ नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव ठाण्याच्या हद्दीत असले तरी सर्व मृत महिला वसमत तालुक्यातील गुंज येथील रहिवासी असून, त्या भुईमूग निंदणीच्या कामासाठी आल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच नांदेडचे अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराय भरणे, उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, विकास माने, तहसीलदार संजय वारकड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, नांदेड मनपाचे अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, आदींसह विविध पथके घटनास्थळी दाखल झाली. बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नांदेड व वसमत येथून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. दरम्यान, मदतीसाठी वसमतचे आ. चंद्रकांत नवघरे, नांदेड उत्तरचे आ. बालाली कल्याणकर, भगवानराव पाटील आलेगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यंत्रणेतील सर्व घटकांसोबत योग्य समन्वय ठेवून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचे दिसून आले.
दोन क्रेनच्या मदतीने बचावकार्य
अपघातग्रस्त वाहन ज्या विहिरीत पडले तिची पाणीपातळी जास्त असल्याने बचावकार्य करताना अडथळा निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने युद्धपातळीवर जनरेटर व पाच मोटारी आणून पाणीउपसा करण्यास प्रारंभ केला. दरम्यान, घटनास्थळी जायला रस्ता नसल्याने रुग्णवाहिका व मदतकार्य करणारी वाहने आणण्यासाठी चार जेसीबी आणून शेतापर्यंत तात्पुरता रस्ता तयार केला. तसेच विहिरीत वाहन व मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन क्रेनही मागविण्यात आले हाेते. वैद्यकीय पथकांसह अन्य यंत्रणाही येथे तैनात होती. शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थ ज्ञानेश्वर शिंदे, नीलेश शिंदे, ओंकार शिंदे, भगवान शिंदे, तुकाराम शिंदे, कैलास शिंदे, वामन शिंदे, आदींनी दोर आणून तिघांना जीवदान दिले.