हळद लागण्याआधीच काळाने गाठलं; नांदेड ट्रॅक्टर अपघातातील मृतांत दोन भावी वधूंचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:31 IST2025-04-05T19:30:48+5:302025-04-05T19:31:35+5:30
हळदीची तयारी थांबून दोन्ही तरुणींना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हळद लागण्याआधीच काळाने गाठलं; नांदेड ट्रॅक्टर अपघातातील मृतांत दोन भावी वधूंचा समावेश
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी सकाळी शेतमजुरीसाठी जात असलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळून सात महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यावेळी विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पण, ट्रॉलीखाली अडकलेल्या सात जणींचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे. मृत दोन्ही तरुणींचा विवाह ठरला होता अशी माहिती आहे. मात्र, आता हळदीची तयारी थांबून त्यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात मृतांमध्ये दोन भावी वधूंचाही समावेश आहे. धृपता सटवाजी जाधव (१८) आणि सिमरन संतोष कांबळे (१८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे लग्न मे महिन्यात ठरले होते. लग्नाचा खर्च भागवण्यासाठी त्या मजुरीसाठी निघाल्या होत्या. पण नियतीने वेगळंच लिहून ठेवलं होतं. धृपता आपल्या आईसोबत मजुरीला गेली होती. या अपघातात दोघींचाही मृत्यू झाला. हळद लागण्याआधीच घरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री मदत निधीतून २ लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कठडे नसलेल्या विहिरींची नोंद घेण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
चालकाने महिलांचं ऐकलं असतं तर...
रुंज, आलेगाव ते कांचननगर रस्त्यापासून जवळपास एक किलोमीटर आत शिंदे यांचे शेत आहे. ज्या शेतात भुईमूग आहे, तिथे ट्रॅक्टर घेऊन जाणे शक्य नाही. पण, सध्या गहू कापणीनंतर रान रिकामं झालेलं आहे. त्यामुळे नागेशने विहीर असलेल्या शेताच्या बाजूने दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे चारी ओली होती. त्यामुळे तेथून ट्रॅक्टरवर काढण्यासाठी त्याला कसरत करावी लागली. ट्रॉली जाणार नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलांनी इथेच उतरू दे, आम्ही पायी येताे, असा आग्रही धरला. पण, नागेशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चारीतून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्पीड वाढविली अन् ट्रॅक्टर चारीतून निघून थेट विहिरीत कोसळले.