नांदेडमध्ये ट्रकसह स्कूल बसचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:52 AM2018-07-21T00:52:20+5:302018-07-21T00:52:58+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, बेहिशेबी टोलवसुली, विमा उतरविण्यासाठी लागणारी रक्कम यासह इतर मागण्यांसाठी मालवाहतूकदार संघटनेने शुक्रवारी देशव्यापी चक्काजामची हाक दिली होती़ त्याला नांदेडातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३ हजार ट्रकचालकांनी चक्काजाम केला़ तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्कूल बस चालकांनीही एक दिवशीय संप पुकारला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, बेहिशेबी टोलवसुली, विमा उतरविण्यासाठी लागणारी रक्कम यासह इतर मागण्यांसाठी मालवाहतूकदार संघटनेने शुक्रवारी देशव्यापी चक्काजामची हाक दिली होती़ त्याला नांदेडातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३ हजार ट्रकचालकांनी चक्काजाम केला़ तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्कूल बस चालकांनीही एक दिवशीय संप पुकारला़
नांदेड जिल्हा मोटर मालक संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजता माळटेकडी चौरस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले़ या आंदोलनामुळे माळटेकडी ते भोकर फाटा अशा तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ तर माळटेकडी ते धनेगावपर्यंतही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ आंदोलनात नांदेड जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष सुखविंदरसिंघ हुंदल, भूपेंद्रसिंग रंगी, हरपालसिंघ गुलाटी, भागेंद्रसिंग गुलाटी, जोगेंद्रसिंग खैरा, कालासिंग खैरा, निमासिंग संधू, फारुख, माजीद खान, सोनूसिंह परमार, गुरमितसिंग खैरा, विशाल होळकर, निर्मलसिंग फौजी, मारोती शिंदे, पप्पूसिंग संधू, ओ़पी़भाटीया, स्वरुपसिंग आदींचा समावेश होता़
दरम्यान, जवळपास दोन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे इतर वाहनधारकांची मात्र मोठी गैरसोय झाली़ यावेळी दोन्ही रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़
----
सर्व प्रकारच्या वाहनांतून माल वाहतुकीस मुभा
विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस यांनी शुक्रवारपासून माल वाहतूकदारांचे बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु केल आहे़ या काळात सर्वसामान्य जनतेची गैरसोय होवू नये यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांतून, खाजगी वाहनांतून त्याचप्रमाणे कंत्राटी व टप्पा वाहतूक करणाऱ्या बसेसमधून माल वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे़ याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे़ दरम्यान, अत्यावश्यक वस्तूची वाहतूक, पुरवठा यासंदर्भात अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष ०२४६२-२३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़ तसेच याबाबत उपाययोजना करण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे़
---
पाल्यांचे हाल, पालकांची धावपळ
माल वाहतूकदारांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे़ या आंदोलनाला स्कूल बसचालकांनीही पाठिंबा दर्शविला होता़ त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील जवळपास १३८० स्कूल बसेस बंदच होत्या़ सकाळी स्कूल बस न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले असून पालकांचीही धावपळ उडाली होती़ याचा परिणाम आज बहुतांश शाळांतील पटसंख्येवर झाला होता़
पेट्रोल आणि डिझेलची दररोज दरवाढ होत आहे़ त्यामुळेच स्कूल बस चालकांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार काही स्कूल बसचालकांनी दरात ५० ते ७५ रुपयांची वाढ केली होती़ परंतु त्यानंतरही दररोज दरवाढ होत असल्यामुळे नुकसान होत असल्याचे स्कूल बसचालकांचे म्हणणे आहे़ प्रत्येकवेळी वाहतूक दरात वाढ केल्यामुळे पालकांच्या रोषाचा सामनाही स्कूल बस चालकांना करावा लागत आहे़ त्यात यापूर्वी स्कूल बसचा विमा काढण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये लागत होते़ आता तब्बल एक लाखांचा खर्च येत आहे़ त्याचाही फटका बसचालकांना बसत आहे़ तर दुसरीकडे अवैधपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा शहरात अनेक आहेत़ या सर्व विषयांवर शुक्रवारी स्कूल बसचालकांनी शंभर टक्के बंद पाळला़ त्यामुळे सकाळी स्कूल बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली़ तर स्कूल बस न आल्यामुळे पाल्यांना शाळेत वेळेवर पोहोचविण्यासाठी पालकांना बरीच धावपळ करावी लागली़ त्यामुळे बहुतांश शाळेतील पटसंख्या आज कमीच भरली़ शनिवारी मात्र सर्व बसेस धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़
---
नांदेड जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष सुखविंदरसिंग हुंदल म्हणाले, इंधन दरवाढ कमी करण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाºयांनी सरकारशी अनेकवेळा बोलणी केली़ परंतु, त्यानंतर दरवाढ कमी करण्यात आली नाही़ आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास तीन हजार ट्रक मालकांनी सहभाग घेतला़ जिल्ह्यातून दररोज बाहेर पडणाºया एक हजार ट्रकव्या जाण्या-येण्यावरही त्यामुळे परिणाम झाला़
नांदेड जिल्हा स्कूल बस, व्हॅन असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनदरात वाढ होत आहे़ विमा व इतर कागदपत्रांसाठीही मोठी रक्कम मोजावी लागत आहे़ शुक्रवारी पुकारण्यात आलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला आहे़ पालक व विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करीत असल्याचेही ते म्हणाले़