नांदेडमध्ये दुचाकीचोरी अदलखपात्रच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:53 AM2018-05-21T00:53:48+5:302018-05-21T00:53:48+5:30
चार महिन्यांतच जिल्ह्यातील ६५ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़ परंतु, त्यातील केवळ चोरीच्या सात घटनांचा उलगडा झाला आहे़ यावरुन पोलिसांच्या लेखीही दुचाकीचोरी अदखलपात्रच असल्याचे स्पष्ट होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : बाजारात सध्या विविध कंपनीच्या महागड्या दुचाकी विक्रीसाठी येत आहेत़ हजारो रुपये खर्च करुन मोठ्या हौशेने नागरिक या दुचाकी खरेदी करीत आहेत़परंतु, चोरट्यांच्या दृष्टीने या दुचाकी सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याची गेल्या काही महिन्यांत झालेल्या दुचाकीचोरीच्या घटनांवरुन लक्षात येते़ चार महिन्यांतच जिल्ह्यातील ६५ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़ परंतु, त्यातील केवळ चोरीच्या सात घटनांचा उलगडा झाला आहे़ यावरुन पोलिसांच्या लेखीही दुचाकीचोरी अदखलपात्रच असल्याचे स्पष्ट होते़
जिल्ह्यात आजघडीला पाच लाखांवर दुचाकींची संख्या आहे़ मागील वर्षी बीएस-३ दुचाकीवर शासनाने बंदी आणल्यानंतर दोन ते तीन दिवसांतच नांदेडकरांनी हजारो दुचाकींची सवलतीच्या दरात खरेदी केली़ ६ लाख लोकसंख्या आणि ८० हजारांवर मालमत्ता असलेल्या नांदेडात प्रत्येक घरात किमान दोन दुचाकी आहेत़ दुचाकी ही सर्वांची आता अत्यावश्यक बाब झाली आहे़ परंतु ही दुचाकीच्या सुरक्षेबाबत मात्र योग्य ती खबरदारी घेतली जात नाही़
त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ किंवा घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरटा कधी पळवेल याचाही नेम राहिला नाही़ धूमस्टाईलने हे चोरटे दुचाकी पळवित असल्याचे सीसीटीव्हीतील अनेक दृश्यावरुनही स्पष्ट झाले आहे़ परंतु, त्यानंतर पोलीस तपास पुढे सरकतच नाही़
त्यामुळे या चोरट्यांची हिंमत वरचेवर वाढत आहे़ नांदेडात जानेवारी महिन्यात १४, फेब्रुवारीत ११, मार्चमध्ये २१ तर एप्रिल महिन्यात १९ अशा एकूण ६५ दुचाकींची चोरी झाली आहे़ मे महिन्यातही लग्नसराईच्या हंगामामुळे दर दिवशी सरासरी दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या़
पोलिसांच्या मूल्यांकनानुसार या दुचाकींची किंमत केवळ १९ लाख ५२ हजार ३४० रुपये एवढी दाखविण्यात आली आहे़ प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पट जास्त किंमत या दुचाकींची बाजारात आहे़ त्यापैकी फक्त सात दुचाकीचोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत़
विशेष म्हणजे, दुचाकीचोरीचा गुन्हाही किमान आठ दिवसानंतर दाखल करुन घेतला जातो़ पोलिसांकडून मोबाईलप्रमाणेच दुचाकी चोरीच्या घटना गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचेच यावरुन स्पष्ट होते़ त्यामुळे नागरिकांनीच आता काळजी घेण्याची गरज आहे़
---
चोरीच्या दुचाकी शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेशात
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत पकडलेल्या दुचाकी चोरांनी या सर्व दुचाकी तेलंगणा अािण आंध्रात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले़ रस्त्याने किंवा मिळेल त्या वाहनाने या दुचाकी तेलंगणा आणि आंध्रात पाठविल्या जातात़ या ठिकाणी त्या दुचाकीचा चेसिस, नंबरप्लेट बदलून बिनधास्त विक्री केली जाते़
---
नांदेडातून अशाप्रकारे हजारो दुचाकी तेलंगणा आणि आंध्रात आजही रस्त्यावर धावत असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्याचबरोबर काही दुचाकींचे स्पेअर पार्ट काढून त्याची विक्रीही करण्यात येते़ त्याचबरोबर घरासमोर लावलेल्या दुचाकीतील पेट्रोल, बॅटरी व इतर साहित्याची चोरी करणारे भुरटे चोरही गल्लोगल्ली सक्रिय झाले आहेत़ त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गस्त वाढविण्याची गरज आहे़
---
दुचाकीचोरीच्या अनेक घटनांमध्ये चोरटे हे अल्पवयीन किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे उघडकीस आले आहे़ मागील वर्षी बाहेरगावावरुन शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घरातून खर्चासाठी पैसे मिळत नसल्यामुळे दुचाकीचोरांची टोळी तयार केली होती़ विशेष म्हणजे, दुचाकी चोरीतील गुन्हेगार हे रेकॉर्डवरील नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अडचण निर्माण होते़
विसावा उद्यानासमोरुन दुचाकी लंपास- राजनगर येथील राहुल संभाजी पवार यांनी १५ मे रोजी (एम़एच़२६, ए़एच़६३६९) या क्रमाकांची दुचाकी विसावा उद्यानासमोर लावली होती़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नोंद केली़ चोरट्यांनी ती लांबविली़ भाग्यनगर हद्दीत १४ मे रोजी रामराव पवार मार्गावर मित्राच्या घरासमोर सौरभ संजय देठे या विद्यार्थ्याने (एम़एच़२६, ए़व्ही़९१६०) ही पल्सर कंपनीची दुचाकी उभी केली होती़ ती लंपास करण्यात आली़ कंधार येथील अभियंता तुकाराम केंद्रे हे १८ मे रोजी नांदेडात खरेदीसाठी आले होते़ त्यांनी (एम़एच़२६, बी़जे़५९१९) या क्रमांकांची टीव्हीएस अपाची कंपनीची दुचाकी जुना मोंढा येथे उभी केली होती़ खरेदीवरुन परत आल्यानंतर मात्र दुचाकी गायब असल्याचे लक्षात आले़ याप्रकरणी इतवारा ठाण्यात गुन्हा नोंद झाला़