Nanded: मुखेडजवळ विद्यार्थ्यांची दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:17 IST2025-04-09T14:13:43+5:302025-04-09T14:17:01+5:30
इतर दोघांना डोक्यात जबर मार लागला असून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे.

Nanded: मुखेडजवळ विद्यार्थ्यांची दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
- शेखर पाटील
मुखेड (नांदेड): चांडोळा गावाजवळ तळ्यातून माती घेऊन येणारा ट्रॅक्टर आणि कॉम्प्युटर क्लाससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला. या धडकेत एक विद्यार्थी जागेवर ठार झाला. तर इतर दोघांना डोक्यात जबर मार लागला असून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान झाली आहे.
धनज गावातील मनीष राम वल्लेमवाड (१८), मारोती राजेश घोडके (१७), विवेक संतोष मानेकर ( २०) हे तिघे आज सकाळी एमएससीआयटी संगणक कोर्ससाठी दुचाकीवरुन ( क्रमांक एम एच २६ X २५८६) मुखेडकडे येत होते. चांडोळा गावा जवळील तलावातून काळी माती घेऊन एक ट्रॅक्टर ( क्रमांक एम एच २६ बी एक्स ३२७८) अचानक मुख्य रस्त्यावर आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दुचाकीची व ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यात मनीष उर्फ मनोज राम वल्लेमवाड याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. तर मारोती घोडके याचा डावा हात फ्रॅक्चर असून डोक्यात गंभीर दुखापत आहे. तसेच विवेक मानेकर यास डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर दोघांना डॉ.प्रकाश ठक्करवाड यांनी अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.
रस्त्यावर झाडांची बेसुमार वाढ
खरब खंडगाव ते राजूरा या रस्त्यावर झाडेझुडपे वाढले आहेत. त्यामुळे वळणावर अचानक समोरून किंवा बाजूने वाहन आलेले कळत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.