नांदेडमध्ये सेनेच्या मतदारसंघातील कामे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:55 AM2018-04-30T00:55:53+5:302018-04-30T00:55:53+5:30
दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आ. हेमंत पाटील करीत असतानाही हा निर्णय सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आ. हेमंत पाटील करीत असतानाही हा निर्णय सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.
दलितवस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ साठी १५ कोटी ६६ लाख ५४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महापालिकेने सर्वसाधारण ठराव करत कामांची निवड केली. जवळपास ६५ कामे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आली होती. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या १५ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपयांच्या ६४ कामांना मंजुरी देण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठविले होते.
यापैकी पालकमंत्र्यांनी १५ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपयांच्या ७० विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली ४९ कामे ही महापालिकेने प्रस्तावित केलेली आहेत. पालकमंत्र्यांनी महापालिकेने पाठविलेली १७ कामे रद्द करताना नवीन २१ कामे सुचविली आहेत. या कामाचे कोणतेही प्रस्ताव महापालिकेने पाठविले नव्हते. परिणामी पालकमंत्र्यांनी स्वतंत्रपणे ही कामे सुचविली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेला कळविताना पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या कामांचे प्रस्ताव नव्याने पाठविण्याची सूचना केली आहे.
पालकमंत्र्यांच्या निर्णयास महापालिका पदाधिकाºयांनी विरोध केला आहे. पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या कामामध्ये सिडकोतील मुख्य रस्त्याचाही समावेश होता. जवळपास २ कोटी रुपये खर्चून दलितवस्ती निधीतून हा रस्ता केला जाणार होता. त्याचवेळी प्रभाग २० मध्ये ३६ लाखांची कामे सुचविली होती. प्रभाग १९ मध्येही ३८ लाख ७८ हजारांची कामे सुचविली होती. ही कामे रद्द केली आहेत. पालकमंत्र्यांनी स्वत: सुचविलेल्या कामामध्ये बहुतांश कामे ही उत्तर नांदेडातील आहेत.
दक्षिण नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आ. हेमंत पाटील हे करतात. त्यांच्या मतदारसंघातील कामे रद्द करुन उत्तर नांदेडात कामे सुचविणे ही बाब अनेकांना खटकणारी ठरली आहे. त्याचवेळी शिवसेनेत सर्वकाही अलबेल आहे, ही बाबही चुकीचीच ठरली आहे.
सिडकोत मुख्य रस्त्याची गरज होती. या भागातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे.
महापालिका पदाधिकाºयांनीही पालकमंत्र्यांचा हा निर्णय शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासणारा असल्याची टीका केली आहे. या विरोधात वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचाही इशारा दिला आहे. सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, भाजपाच्या नगरसेविका बेबीताई गुपिले यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.
महापालिका फेरठराव घेणार का ?
महापालिकेने पाठविलेले १७ ठराव रद्द करुन पालकमंत्री कदम यांनी २१ नवी कामे सुचविली आहेत. जिल्हाधिकाºयांनी याबाबत महापालिकेला कळविताना २१ कामे ही महापालिकेच्या प्रस्तावात नमूद नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच २१ कामांसाठी समाजकल्याण अधिकाºयांचा स्थळ पाहणी अहवालही नसल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे पालकमंत्र्यांनी सादर केलेल्या नव्या २१ कामांचे फेरप्रस्ताव पाठवावेत, अशी सूचना महापालिका आयुक्तांना जिल्हाधिकाºयांनी केली आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या बदलीनंतर नांदेड महापालिकेचा पदभार हा जिल्हाधिकाºयांकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्यात आला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी आणि आयुक्त हे भार सांभाळणारे अरुण डोंगरे या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. त्याचवेळी महापालिका सभागृह फेरप्रस्ताव सादर करेल का हेही लवकरच कळणार आहे.