नांदेड जिल्हा परिषदेला दलित वस्तीचे ३० कोटी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:34 PM2020-01-11T13:34:21+5:302020-01-11T13:36:51+5:30
समाजकल्याण समितीच्या बैठकीत निधीचे नियोजन
नांदेड : दलित वस्ती विकास योजनेतंर्गत २०१८- १९ मधील मंजूर झालेले ५० कोटीपैकी ३० कोटी रूपये प्राप्त झाले असून या निधीचे नियोजन करणाऱ्या ठरावास मान्यता देण्यात आली आहे़
जिल्हा परिषद नांदेड समाज कल्याण समिती मासिक सभा शुक्रवारी दुपारी सभापती शीला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत वस्त्यांची निवड करणे बाबतचा ठराव विषयसूचीप्रमाणे घेण्यात आला. सदर योजनेअंतर्गत २०१८- १९ मध्ये ५० कोटी रूपये मंजूर झाले असून त्यापैकी डिसेंबरअखेर ३० कोटी रूपये तरतूद प्राप्त असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी सभेत दिली. या निधीचे नियोजन करण्याबाबतच्या ठरावास सभापतींसह उपस्थित सर्व समिती सदस्यांनी मान्यता दिली.
वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी निवडीबाबतचा विषय घेण्यात आला असून २०१८- १९ या वर्षात ज्या लाभार्थ्यांनी शिलाई मशीन, सायकल, विद्युत मोटार, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, वाहन योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवेदनपत्र सादर केलेली आहेत, अशा लाभार्थ्यांची निवड समितीमध्ये करण्यात आली आहे. ५ टक्के दिव्यांग आणि जिल्हा दिव्यांग निधी या योजनेचे लाभार्थी निवडीसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सादर करायच्या प्रस्तावास देखील समितीने मान्यता दिली़ या सभेस समाजकल्याण समिती सदस्य संगीता अटकोरे, सविता वारकड, विजयश्री कमठेवाड, शकुंतला कोलमवाड - बोनलेवाड, संगीता गायकवाड, सुंदराबाई मरखले, भाग्यश्री साबणे, सुनयना जाधव व गंगाप्रसाद काकडे उपस्थित होते़
लाभार्थ्यांची निवड
२०१८- १९ या वर्षात शिलाई मशीन, सायकल, विद्युत मोटार, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी तसेच वाहनासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड समाजकल्याण समितीच्या बैठकीत करण्यात आली़