नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षक दिसणार राखाडी पँट, आकाशी शर्टमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:54 AM2018-07-21T00:54:59+5:302018-07-21T00:55:32+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकाऱ्यांनाही गणवेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानंतर शिक्षकांना कोणत्या रंगाचा गणवेश असावा, तसेच शिक्षिकांना कोणत्या रंगाची साडी गणवेश म्हणून लागू करावी, याबाबतचा निर्णय मागील काही दिवसांपासून प्रलंबित होता. दरम्यान, शुक्रवारी शिक्षकांच्या गणवेशाच्या रंगावर शिक्कामोर्तब झाले. येत्या १५ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेतील शिक्षक राखाडी पँट आणि आकाशी शर्टमध्ये दिसणार आहेत.
विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकाऱ्यांनाही गणवेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानंतर शिक्षकांना कोणत्या रंगाचा गणवेश असावा, तसेच शिक्षिकांना कोणत्या रंगाची साडी गणवेश म्हणून लागू करावी, याबाबतचा निर्णय मागील काही दिवसांपासून प्रलंबित होता. दरम्यान, शुक्रवारी शिक्षकांच्या गणवेशाच्या रंगावर शिक्कामोर्तब झाले. येत्या १५ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेतील शिक्षक राखाडी पँट आणि आकाशी शर्टमध्ये दिसणार आहेत.
शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली ३ जुलै रोजी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत जि. प. सदस्य साहेबराव धनगे यांनी शिक्षकांसह विस्तार अधिकारी तसेच मुख्याध्यापकांना ड्रेसकोड लागू करण्याची मागणी केली होती. खाजगी शाळांमध्ये अत्यल्प वेतन असणारे शिक्षक, कर्मचारी पोशाखामध्ये असतात. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेतील शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू केल्यास जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावेल. याबरोबरच शिक्षकांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल. सदर शिक्षक कोठेही दिसल्यास तो जिल्हा परिषदेचा शिक्षक असल्याचे ओळखू येईल. पर्यायाने याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांवरही होईल. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी केली होती. या मागणीला जि.प. सदस्य व्यंकटराव गोजेगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, बबन बारसे, ज्योत्स्ना नरवाडे, संध्याताई धोंडगे, अनुराधा पाटील आदी सदस्यांनीही उचलून धरले. त्यामुळे सदर बैठकीतच ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही बैठक झाल्यानंतर शिक्षकांना कोणत्या रंगाचा शर्ट आणि पँट तर शिक्षिकांसाठी कोणत्या रंगाची साडी असावी, यावर दीर्घ चर्चा झाली. अखेर शुक्रवारी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्यासह सदस्यांनी बैठक घेऊन शिक्षकांचा गणवेश निश्चित केला. यानुसार शिक्षकांसह मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांच्यासाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट असा गणवेश लागू करण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, शिक्षिकांसाठीच्या साडीच्या रंगासंबंधीही या बैठकीत चर्चा झाली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय शनिवारी सकाळी होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, २०१२ मध्येही नांदेड जिल्हा परिषदेत शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. त्यानंतर सहा वर्षांनी शिक्षण समितीने ड्रेसकोडचा निर्णय घेतला असून बहुतांश शिक्षक संघटनांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला असल्याने येत्या १५ आॅगस्टपासूनच शिक्षकांसह शिक्षिका गणवेशामध्ये दिसणार आहेत.
----
शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षकांसह मुख्याध्यापक, विस्तार अधिकाºयांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण समितीनेच शिक्षकांच्या पोशाखाचा रंग सर्वसंमतीने निश्चित केला आहे. जिल्हा परिषदेचा हा वेगळा उपक्रम असून यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
- अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड