नांदेडात चार क्विंटल प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:33 AM2018-10-27T00:33:08+5:302018-10-27T00:37:00+5:30
प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेड महापालिकेने जुना मोंढा परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारल्या होत्या़ त्यात याच भागातील एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली़ यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेड महापालिकेने जुना मोंढा परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारल्या होत्या़ त्यात याच भागातील एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली़ यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले़ या व्यापा-याला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे़ यावरुन या व्यापा-याला कुणाचे अभय आहे आहे? हा संशोधनाचा विषय आहे़
महापालिकेचे पथक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संयुक्तपणे कारवाया करीत आहेत़ जुना मोंढा परिसरात मागील महिन्यात महापालिकेच्या पथकाने अग्रवाल बॅग्ज या दुकानावर छापा मारला होत्या़ त्यावेळी तीन क्विंटलहून अधिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या होत्या़ त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा याच दुकानावर धाड मारण्यात आली़ त्यावेळी कॅरिबॅग आणि प्लास्टिक जप्त करण्यात आले़ त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने ग्रामीण भागात अनेक विक्रेत्यावर धाडी मारल्या़ या विक्रेत्यांनी कॅरिबॅग आणि प्लास्टिकचे इतर साहित्य नांदेडातील अग्रवाल बॅग्ज येथून घेतल्याचे या पथकांना सांगितले़ त्यामुळे जिल्हाभरात अग्रवाल हाच प्लास्टीकचा पुरवठा करीत असल्याचे सिद्ध झाले आहे़
या माहितीवरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी शुक्रवारी तिस-यांदा धाड मारली़ यावेळी दुकानात अविघटनशील प्लास्टिकचा चार क्विंटलचा साठा आढळला़ यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राकेश दाफडे, सहाय्यक आयुक्त विलास भोसीकर, क्षेत्रीय अधिकारी शिवाजी डहाळे, बेग यांची उपस्थिती होती़
अर्ध्याहून अधिक माल राहिला होता गोदामातच
पथकाने यावेळी गोदामातील काही क्विंटल माल बाहेर काढून तो वाहनाद्वारे नेला़ त्यानंतर शटर बंद करुन कागदोपत्री कारवाई सुरु होती़ परंतु, याचवेळी बराचसा माल गोदामातच असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळाली़ त्यानंतर पुन्हा गोदाम उघडण्यास सांगितल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल आढळला़ त्यामुळे नजरचुकीने हा प्रकार झाला की ? यामागे काही गौडबंगाल होते हा संशोधनाचा विषय आहे़