नांदेडात गुटखा गोदामावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:20 AM2018-10-29T00:20:04+5:302018-10-29T00:20:30+5:30
शहर व जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री करण्यात येत आहे़ याबाबत रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :शहर व जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री करण्यात येत आहे़ याबाबत रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ प्रशासनाच्या या कारवाईने गुटखा विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली असून या व्यवहाराची संपूर्ण साखळी उघडकीस आणण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे़
राज्यात गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो़ शहर व जिल्ह्यात प्रत्येक पानटपरीवर गुटखा अगदी सहजपणे मिळतो़ गुटखाबंदीच्या निर्णयानंतर त्याच्या किमती मात्र वाढविण्यात आल्या आहेत़ नांदेड जिल्ह्यात शेजारील तेलंगणातून मोठ्या प्रमाणात गुटखा आयात करण्यात येतो़
दररोज गुटख्याचे ट्रक छुप्या मार्गाने नांदेडात दाखल होतात़ त्यामध्ये सीमावर्ती भागातील काहींच्या मेहरनजर मुळे गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण होत आहे़ दरम्यान, रविवारी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे यांना वाजेगांव परिसरात एका गोदामात गुटखा असल्याची खबºयाकडून माहिती मिळाली होती़
त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री घाटे व त्यांच्या कर्मचाºयांच्या मदतीने दुपारी दिल्ली ट्रान्सपोर्ट या गोदामावर छापा मारण्यात आला़ मिर्झा महेबुब बेग मिर्झा मोहसिन बेग यांच्या मालकीचे हे गोदाम आहे़ गोदामात युके-३३०० या ब्रॅन्डचा तब्बल १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा आढळला़ ६० बॉक्समध्ये हा गुटखा ठेवण्यात आला होता़ पोलिसांच्या मदतीने हा सर्व गुटखा जप्त करण्यात आला़ त्यानंतर या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अटकही करण्यात आली आहे़
जुन्या नांदेडात अड्डे
गुटखा विक्रेत्यांचे जुन्या नांदेड परिसरात अनेक अड्डे आहेत़ जुन्या नांदेडातून शहरातील अनेक भागात गुटखा पाठविला जातो़ त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे़ यापूर्वी एका तक्रारकर्त्याने गुटखा अड्डयांची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली होती़ परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती़