मोबाईलद्वारे परीक्षा देण्याचा नांदेडात नवा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:43 AM2018-12-28T00:43:46+5:302018-12-28T00:45:05+5:30

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणारी ‘कलचाचणी व अभिक्षमता’ चाचणी एका केंद्रावर एकाच वेळी ५६७ विद्यार्थ्यांनी देण्याचा नवा विक्रम नांदेडात नोंदविण्याला गेला आहे़

Nandedat New Record for Mobile Examination | मोबाईलद्वारे परीक्षा देण्याचा नांदेडात नवा विक्रम

मोबाईलद्वारे परीक्षा देण्याचा नांदेडात नवा विक्रम

Next
ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाचा उपक्रम महात्मा फुले हायस्कूलमध्ये एकदाच ५६७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

श्रीनिवास भोसले।

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणारी ‘कलचाचणी व अभिक्षमता’ चाचणी एका केंद्रावर एकाच वेळी ५६७ विद्यार्थ्यांनी देण्याचा नवा विक्रम नांदेडात नोंदविण्याला गेला आहे़ यापूर्वी ठाण्यामध्ये ४३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची नोंद असून तो आकडा नांदेडने मोडीत काढला आहे़
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग व विद्या प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कल प अभिक्षमता चाचणी घेण्यात येते़ केवळ माहितीच्या अभावामुळे पालक आणि विद्यार्थी, दहावीनंतर काय? याबाबत द्विधा मन:स्थितीत असतात आणि परिस्थितीजन्य कारणांअभावी कित्येकदा आवड आणि अभिक्षमता नसणाऱ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतला जातो. हा धोका टाळता यावा व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी करण्यासाठी रचनात्मक बदलाचाच भाग म्हणून सदर चाचणी घेण्यात येत आहे़ सदर चाचणीत भाषिक, सांख्यिकीय, अवकाशीय आणि तार्किक या चार क्षमतांचे मापन केले जाते़ यामध्ये वाणिज्य, कला, विज्ञान, यांत्रिक कला, गणवेशधारी सेवा, ललित क्षेत्र आदी क्षेत्रांविषयी विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय दृष्टीकोण तपासला जातो़
चाचणीसाठी वेळेची मर्यादा असून क्षमता परीक्षणासाठी १५ मिनिटे व तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय क्षमता परीक्षणासाठी प्रत्येकी २० मिनिटे दिली़ यामुळे विद्यार्थ्यांना आवड आणि क्षमता यांची योग्यरित्या सांगड घालण्यास नक्कीच मदत होईल. ‘महाकरिअरमित्र’ अ‍ॅपच्या माध्यमातून परीक्षा घेतली जात आहे़
डीआयईसीपीडी, श्रीनगर यांच्या नियोजनाखाली जिल्ह्यातील ६२५ माध्यमिक शाळांत १८ डिसेंबरपासून सदर परीक्षा घेतली जात आहे़ यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळांचा समावेश असून ५४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे़ दरम्यान, २७ डिसेंबर रोजी बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक व्यंकट पाटील यांच्या नियोजनातून विजयनगर, बाबानगर येथील महात्मा फुले शाळेतील ५६७ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ५६७ मोबाईलवर परीक्षा देवून नवा विक्रम निर्माण केला आहे़ यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक युवराज देशमुख, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांच्यासह मास्टर ट्रेनर, अविरतचे सर्व प्रशिक्षणप्राप्त मुख्याध्यापक परिश्रम घेत आहेत़
आतापर्यंत राज्यातील सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांनी दिली कल चाचणी
सन २०१६-१७ मध्ये दहावीच्या बहिस्थ: विद्यार्थ्यांसह एकूण १६ लाख ६७ हजार ४४५ तर २०१७ -१८ मध्ये १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी संगणकाद्वारे दिली होती़ मात्र यंदापासून अभिक्षमता चाचणी ‘मोबाईल अ‍ॅप’द्वारे घेण्यात येत असून त्यास विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे़ दरम्यान, आपल्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओज पाहू शकतील व तज्ज्ञांचे लेख वाचू शकतील. २०१८-१९ साठीची कल व अभिक्षमता चाचणी १८ डिसेंबर २०१८ रोजी शाळांमध्ये सुरु झाली असून आजपर्यंत ८ लाख २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली़ त्यासाठी ४ लाख ९२ हजारपेक्षा जास्त मोबाईल फोन वापरले गेले आहेत़
ठाण्याचा रेकॉर्ड मोडला
यापूर्वी ठाण्यात ४३८ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी परीक्षा दिली होती़ तो तोडून ५६७ विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड महात्मा फुले शाळेच्या माध्यमातून नांदेडच्या नावे निर्माण झाला आहे़ तसेच सातारा - ३८५, बुलढाणा- ३००, कन्नड - २४५ तर अकोला येथे २१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची नोंद आहे़

Web Title: Nandedat New Record for Mobile Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.