नांदेडात कोकाटे, बोंढारकर, मुंढे शिवसेनेचे नवे शिलेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:44 AM2018-10-04T00:44:34+5:302018-10-04T00:45:05+5:30
महापालिका निवडणुकीपासून रिक्त असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना विद्यमान दोन्ही जिल्हाप्रमुखांना डच्चू देत जिल्ह्यात दोनऐवजी आता तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे़ त्यात बाबूराव कदम यांचे पद काढून घेणे आश्चर्यकारक आहे़ तर भुजंग पाटील यांचेही मराठा आंदोलनातील घटनेनंतर पद कायम राहील अशी अपेक्षा होती मात्र तीही फोल ठरली आहे़ नव्या निवडीत दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे यांची निवड अपेक्षित असली तरी आनंद बोंढारकर यांना मात्र जिल्हाप्रमुख पदाची लॉटरीच लागली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीपासून रिक्त असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना विद्यमान दोन्ही जिल्हाप्रमुखांना डच्चू देत जिल्ह्यात दोनऐवजी आता तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे़ त्यात बाबूराव कदम यांचे पद काढून घेणे आश्चर्यकारक आहे़ तर भुजंग पाटील यांचेही मराठा आंदोलनातील घटनेनंतर पद कायम राहील अशी अपेक्षा होती मात्र तीही फोल ठरली आहे़ नव्या निवडीत दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे यांची निवड अपेक्षित असली तरी आनंद बोंढारकर यांना मात्र जिल्हाप्रमुख पदाची लॉटरीच लागली आहे़
महापालिका निवडणुकीदरम्यान नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला होता़ तेव्हापासून उत्तरचे जिल्हाप्रमुख पद रिक्तच होते़ महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सडकून अपयशानंतर जिल्हाप्रमुख बदलांची चर्चा सुरु झाली होती़ परंतु हा प्रश्न पक्षनेतृत्वाकडे रेंगाळत पडला होता़ जिल्हाप्रमुख पदाच्या नावावर पालकमंत्री, आमदार, संपर्कप्रमुखांचे एकमत होत नसल्यामुळेच या निवडी रखडल्या होत्या़
इतर पक्ष आगामी निवडणुकीची जय्यत तयारी करीत असताना शिवसेनेत मात्र नियुक्तीचा घोळ सुरु होता़ पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षातील अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून मुंबई मुक्कामी होते़ मातोश्रीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत होते़ मात्र शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख भुजंग पाटील आणि बाबूराव कदम यांची उचलबांगडी झाली. जिल्हाप्रमुख नांदेड दक्षिण, लोहा व भोकर मतदारसंघाची जबाबदारी बोंढारकर यांच्यावर सोपविली आहे़ तर दत्ता पाटील कोकाटे यांच्याकडे नांदेड उत्तर, किनवट व हदगाव विधानसभा मतदारसंघ, उमेश मुंढे यांच्याकडे देगलूर, मुखेड आणि नायगाव मतदारसंघ दिला आहे.
तर बाबूराव कदम यांची समन्वयक म्हणून निवड करीत त्यांच्याकडे नांदेड दक्षिण, लोहा आणि भोकर, भुजंग पाटील यांना सहसंपर्कप्रमुख पद देण्यात आले असून त्यांच्याकडे देगलूर आणि हदगाव, बंडू खेडकर यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्याकडे नांदेड उत्तर तर संघटक असलेल्या व्यंकटराव लोहबंदे यांच्याकडे देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राहणार आहे़
नव्या पदाधिकाºयांच्या निवडीत आ़ हेमंत पाटील यांच्या समर्थकांचीच वर्णी लागली असून आ़ सुभाष साबणे, आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या समर्थकांना बाजूला ठेवण्यात आले आहे़ पक्षीय संघटनेत आ़ पाटील हेच वरचढ ठरले आहेत़
नांदेड दक्षिणचे जिल्हाप्रमुख म्हणून आनंद बोंढारकर यांची निवड शिवसैनिकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी असलेल्या नांदेड दक्षिण मतदारसंघाची धुरा बोंढारकर यांना देतानाच लोहा आणि भोकर मतदारसंघही त्यांच्या अखत्यारित सोपवले आहेत़ नांदेड उत्तरमधून जिल्हाप्रमुख पदासाठी दत्ता पाटील कोकाटे आणि उमेश मुंडे हे स्पर्धेत होते़
त्यांच्या निवडीने सेनेचे कट्टर समर्थक असलेल्यांना न्याय मिळाल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली़ कोकाटे यांना नांदेड उत्तरसह किनवट व हदगाव मतदार संघ आणि मुंडे यांच्याकडे देगलूर, मुखेड आणि नायगाव हे तीन मतदारसंघ सोपवले आहेत़ सेनेच्या या पदाधिकारी निवडीत बाबूराव कदम यांची गच्छंती ही शिवसैनिकांना न पटणारी ठरली आहे़ सर्वसामान्यांना घेऊन चालणारा नेता अशी ओळख असताना अनपेक्षितपणे कदम यांना जिल्हाप्रमुख पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे़ त्यांना समन्वयक म्हणून जबाबदारी दिली़ आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने नव्या शिलेदारांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली असून हे नवे शिलेदार शिवसेनेला जिल्ह्यात गतवैभव मिळवून देतील काय? हे निवडणुकानंतरच स्पष्ट होईल़
मानसपुत्राचाही अपेक्षाभंग
शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत माधव पावडे यांचेही नाव होते. नव्या निवडीत आपल्याला स्थान मिळेल, असा विश्वास पावडे यांना शेवटपर्यंत होता. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या पावडे यांना हीच ओळख पदापासून दूर घेवून गेली आहे. त्यातही पावडे यांची अलीकडील काळात चिखलीकरांशी वाढलेली सलगी पक्षाच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यामुळे या निवडीत पावडे यांना पदापासून दूरच ठेवण्यात आल्याचे समजते.