नांदेडात सुरक्षा उपाययोजनेत स्कूल बसेस नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 08:31 PM2018-07-30T20:31:58+5:302018-07-30T20:33:17+5:30

: जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़

Nandedata security measures are not implemented in school buses | नांदेडात सुरक्षा उपाययोजनेत स्कूल बसेस नापास

नांदेडात सुरक्षा उपाययोजनेत स्कूल बसेस नापास

Next
ठळक मुद्दे ९० टक्के स्कूल बसमध्ये ना अग्निशमनची यंत्रणा होती ना प्रथमोपचार पेटी़ अनेक वाहनांचे दरवाजे आणि खिडक्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले़

नांदेड : जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ यातील ९० टक्के स्कूल बसमध्ये ना अग्निशमनची यंत्रणा होती ना प्रथमोपचार पेटी़ अनेक वाहनांचे दरवाजे आणि खिडक्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले़ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी अधिकाऱ्यांनी यावेळी चालकांना चांगलेच धारेवर धरले़ 

नांदेड शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची संख्या ४०० आहे़ तर अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा व इतर छोट्या वाहनांची संख्या त्यापेक्षा अधिक आहे़ अनेकवेळा या बसेसचे चालक प्रशिक्षित नसतात़ बसची नियमित तपासणी न झाल्यामुळे मध्येच त्या बंद पडणे, किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने रविवार व सुटीच्या दिवशी स्कूल बसची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे़ 

दर रविवारी किंवा सुटीच्या दिवशी किमान १५० स्कूल बसची तपासणी करण्यात येणार आहे़ आज चैतन्यनगर परिसरात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ त्यात वाहनाचा चेसिस क्रमांक, परवाना, कागदपत्रे, वाहनात सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, चालकाचे वर्तन आदींची तपासणी करण्यात आली़ त्यात अनेक वाहनांमध्ये अग्निशमनची कुठलीच यंत्रणा आढळली नाही़ त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीही ठेवण्यात आली नव्हती़ याबाबत प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांनी स्कूल बसचालकांना सूचना दिल्या़ त्याचबरोबर अचानकपणे स्कूल बसची तपासणी करुन कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे़ दरम्यान, या वाहन तपासणीतून रिक्षातून होणारी विनापरवाना वाहतूक मात्र सुटली आहे़ 

रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ‘फ्रंट सिट’ वाहतूक
शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचा परवाना नसतानाही अनेक रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते़ त्यात विद्यार्थ्यांचे अर्धे शरीर बाहेर व अर्धे आतमध्ये असते़ त्याचबरोबर फ्रंट सिटवर वाहनचालकांच्या दोन्ही बाजूने चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसविले जाते़ दुसरीकडे ५० आसनक्षमता असलेल्या स्कूल बसमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो़ या बसवरील वाहनचालक हे किती प्रशिक्षित आहेत? हाही संशोधनाचा विषय आहे़ 

पालकांची जबाबदारीही तेवढीच महत्त्वाची
पोलीस, आरटीओ, शाळा व्यवस्थापन याबरोबरच पालकांचीही तेवढीच जबाबदारी आहे़ आपल्या पाल्यांना रिक्षात बसविल्यानंतर तो कितपत सुरक्षित आहे? याकडे सर्रासपणे कानाडोळा करण्यात येतो़ 

Web Title: Nandedata security measures are not implemented in school buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.