नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:05 AM2019-06-22T00:05:01+5:302019-06-22T00:06:06+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला.
नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. या उत्साही वातावरणात सहभागी घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याचा आनंद नांदेडकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) येथे राज्यस्तरीय योग दिनासाठी मागील दहा दिवसापासून राज्य शासनाच्या विविध आस्थापना आणि पतजंली योगपीठाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शुक्रवारी भल्या पहाटेपासूनच शिबिराकडे जाणारे रस्ते वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला युवक-युवती , महिला -पुरुष, अबाल वृध्द , शिक्षकवर्ग , विद्यार्थी असे शहरी, ग्रामीण भागातील लाखो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या योग प्रात्यिक्षिकांना एका भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पांढºया शुभ्र पोषाखामधील लाखों नागरिक योगासनाचे विविध प्रकार करीत होते. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सलग पाचवे वर्ष असल्याने राज्यस्तरीय शिबिराचा बहुमान नांदेड नगरीला प्राप्त झाल्याने हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवून आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती उत्साही दिसत होता.
यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर-देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आदींसह हजारो योग साधकांची या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नांदेडच्या विद्यार्थ्यांकडून म्युझीकल योगा
नांदेड : नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योग शिबीरामध्ये योगगुरू रामदेव बाबा यांच्या समक्ष मुख्य मंचावर नांदेडच्या विद्यार्थ्यांनी म्युझिकल योगा सादर केला़ लक्ष्य चित्रपटातील कंदे से कंदे मिलते है़़़ या गाण्यावर विविध प्रकारची योगासने करून नांदेडकरांचे लक्ष वेधले़
आंतरराष्ट्रीय स्तरावर योगा स्पर्धेत भारताला विविध पदके मिळवून देणाºया श्रेयस मार्कंण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी काडगे, राही डोईफोडे, बागेश्री जोशी, सौख्य झंवर, श्रीशा मारकोळे, कृष्णा विजय भोसले, लौकिक कदम, संदेश भवर, सुमेध सूर्यवंशी, विनायक पालेकर, प्रचिती येलमगुंडे या विद्यार्थ्यांनी सदर नृत्यामध्ये सहभाग नोंदविला़ सादरीकरणानंतर योगगुरू रामदेव बाबा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे रूद्राक्षाची माळ घालून कौतूक केले़
बसेसची व्यवस्था
नांदेड शहरातील प्रत्येक भागासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था केली होती़ तर शाळकरी मुलांना त्या त्या शाळांच्या बसेसमधून योग शिबीरस्थळी येण्या - जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ त्याचबरोबर शिबीरात सहभागीसाठी पाण्याची छोटी बॉटल आणि बिस्किट पुरविण्यात आले़
नांदेडमध्ये शुक्रवारी पार पडलेले योग शिबीर आनंददायी ठरले. आम्ही योगदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह सहभागी झालो आहोत. योगगुरु रामदेवबाबांना प्रत्यक्षात योगासने करुन दाखवताना पाहता आले. याचा आनंदा आहे.
-रिझवाना अंजुम, उर्दू प्राथमिक शाळा नागार्जुननगर.
व्यायाम आणि योगासने आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून त्यामुळे आपणाला शारिरीक दुखण्यांपासून दूर राहण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची संधी मिळते. -डॉ. राहुल मैड, फिजिओथेरेपी कॉलेज
हा उपक्रम योगदिनाच्या माध्यमातून जगभरात नेवून याला मोठी मान्यता दिली़ भंडारा जिल्ह्यातून योग साधकांचे व प्रचारकांचे पथक पंधरा दिवसांपासून नांदेड येथे होते.
-प्रिती डोंगरवार, भंडारा