दरवाढीची सर्वाधिक झळ नांदेडकरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:41 AM2018-04-05T00:41:07+5:302018-04-05T00:41:07+5:30
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत़ ४ एप्रिल रोजी नांदेडात पेट्रोल ८३़२१ पैसे तर डिझेल ६९़३७ पैसे प्रतिलिटर होते़ तर ५ एप्रिलसाठी हे दर पेट्रोलसाठी ८३़२४ तर डिझेलसाठी ६९़४० पैसे प्रतिलिटर द्यावे लागणार आहेत़ राज्यात नांदेडला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या सर्वाधिक झळा बसत असल्याची माहिती मिळाली आहे़ त्यानंतर अकोल्याचा क्रमांक लागतो़
शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत़ ४ एप्रिल रोजी नांदेडात पेट्रोल ८३़२१ पैसे तर डिझेल ६९़३७ पैसे प्रतिलिटर होते़ तर ५ एप्रिलसाठी हे दर पेट्रोलसाठी ८३़२४ तर डिझेलसाठी ६९़४० पैसे प्रतिलिटर द्यावे लागणार आहेत़ राज्यात नांदेडला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या सर्वाधिक झळा बसत असल्याची माहिती मिळाली आहे़ त्यानंतर अकोल्याचा क्रमांक लागतो़
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरच महागाई अवलंबून आहे़ परंतु, गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे़ मागील वर्षी एप्रिल महिन्यात नांदेडात पेट्रोलचे दर ७४़ ४० पैसे तर डिझेलचा दर ६२़५० पैसे होता़ त्यानंतर वर्षभरात पेट्रोलच्या दरात साधारणत: नऊ रुपये आणि डिझेलच्या दरात सात रुपयांनी वाढ झाली आहे़ गेल्या वर्षभरात केवळ चार वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे़ उर्वरित वेळा मात्र हे दर वाढतच गेले़ १ मार्च रोजी नांदेडात पेट्रोलचे दर ८०़८८ पैसे, डिझेल ६६़७० पैसे, ८ मार्च रोजी पेट्रोल वाढून ८१़६८ पैसे तर डिझेल ६७़३९ पैसे, १४ मार्चला पेट्रोल ८१़७६, डिझेल ७६़३३ तर २२ मार्च रोजी पेट्रोल ८१़५५ तर डिझेल ६७़३३ पैसे दराने विक्री झाले़ त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढच झाली़ १ एप्रिल रोजी पेट्रोल ८३ रुपये, डिझेल ६९़१२, ३ एप्रिल रोजी पेट्रोल ८३़२१, डिझेल ६९़३७ रुपये दराने विक्री करण्यात आले़
गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलमध्ये जवळपास एक ते सव्वा रुपयाने वाढ झाली़ गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे़ अकोला शहरात बुधवारी पेट्रोलचे दर ८१़८४ पैसे तर डिझेलचे दर ६८़६ पैसे एवढे होते़ नांदेड नजीकच्या इतर जिल्ह्यांत इंधनाचे दर त्या तुलनेत कमी आहेत़ दरवाढीमुळे सामान्यांना वाहन परवडेनासे झाले आहे़ दररोज इंधनाच्या दरात बदल होत असून सामान्य मात्र मेटाकुटीला आले आहेत़
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम
४पेट्रोल, डिझेलच्या भडकलेल्या दरामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे़ नांदेड शहरात येणारा भाजीपाला हा आजूबाजूच्या परिसरातून येतो़ त्यामुळे भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूही महाग होण्याची चिन्हे आहेत़ अगोदरच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना इंधनाच्या भडक्याने बजेट पार कोलमडणार आहे़
असे आहेत इतर जिल्ह्यांत दर
४२ एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल ८१़ ८४, डिझेल ६८़०८, सिंधुदुर्ग ८२़६६, ६८़८४, रत्नागिरी ८२़७०, ६८़ ७०, सातारा ८१़९९, ६८़३०, मुंबई ८१़८०, ६८़८९ तर पुणे ८१़६७, ६७़८६ अशाप्रकारे पेट्रोल आणि डिझेलचे दर होते़