नांदेडकरांना पाेलीस आयुक्तालयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:41+5:302021-08-12T04:22:41+5:30
नांदेड : शहराची लाेकसंख्या व महापालिकेचे भाैगाेलिक क्षेत्र वाढण्यासाेबतच गुन्हेगारीही तेवढ्याच माेठ्या प्रमाणात वाढली आहे. गुन्हेगारांच्या अनेक टाेळ्या सक्रिय ...
नांदेड : शहराची लाेकसंख्या व महापालिकेचे भाैगाेलिक क्षेत्र वाढण्यासाेबतच गुन्हेगारीही तेवढ्याच माेठ्या प्रमाणात वाढली आहे. गुन्हेगारांच्या अनेक टाेळ्या सक्रिय असून, गॅंगवार सातत्याने उफाळून येते. त्यामुळे नांदेडला पाेलीस आयुक्तालय स्थापन हाेण्याची प्रतीक्षा आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी यांनीही पाेलीस आयुक्तालयाची आवश्यकता विषद केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून नांदेड शहरासाठी स्वतंत्र पाेलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जात आहे. या आयुक्तालयाची हद्द कुठपर्यंत राहणार, त्यात किती पाेलीस ठाण्यांचा समावेश असेल, वाहने, मनुष्यबळाची आवश्यकता, इमारत अशा विविध मुद्द्यांवर शासनाला अपडेट माहिती पाठविण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी यावर्षीसुद्धा हा प्रस्ताव नव्याने बाेलविला आहे. नांदेडला पाेलीस आयुक्तालय का हवे, याची पार्श्वभूमी ना. चव्हाण यांच्याकडून शासनाला पटवून दिली जात आहे. आयुक्तालय व्हावे, यासाठी जाेरदार प्रयत्नही केले जात आहेत. या आयुक्तालयाच्या स्थापनेसाठी शासनावर फारसा आर्थिक भार पडणार नाही, असेही सांगण्यात आले.
पाेलीस आयुक्तालय स्थापन झाल्यास किमान आठ ते नऊ पाेलीस स्टेशन राहणार आहेत. लिंबगाव, उस्माननगर, अर्धापूर, साेनखेड या पाेलीस ठाण्यांचा आयुक्तालयात समावेश केला जाईल. याशिवाय भाग्यनगर, विमानतळ, ग्रामीण या पाेलीस ठाण्यांचे विभाजन करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यात सध्या अपर पाेलीस अधीक्षकाची दाेन पदे आहेत. आयुक्तालय झाल्यास त्यातील एक पद रद्द हाेऊन उपायुक्त म्हणून गणले जाणार आहेत. सध्या पाेलीस अधीक्षक कार्यालय असलेल्या इमारतीमध्येच आयुक्तालय स्थापन करून पाेलीस अधीक्षक कार्यालयासाठी नवी इमारत शाेधली जाणार आहे.
चाैकट....
काेल्हापूर, अकाेल्यातही मागणी
नांदेडपाठाेपाठ काेल्हापूर व अकाेला येथेही पाेलीस आयुक्तालयाची मागणी हाेत आहे. त्यासाठी वाढती गुन्हेगारी हे प्रमुख कारण सांगितले जाते.
चाैकट....
महसूल आयुक्तालय राजकीय वादात
मराठवाड्यातील दुसरे विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडमध्ये हवे, की लातूरमध्ये ? हा राजकीय वाद अद्याप सुटलेला नाही. मात्र, प्रशासकीय स्तरावरील बहुतांश यंत्रणा महसूल आयुक्तालय भाैगाेलिकदृष्ट्या नांदेडमध्येच हवे, असे सांगत आहे.
काेट....
गेल्या दाेन-तीन वर्षात नांदेड शहरात गुन्हेगारी वाढली आहे. जिल्ह्याला कर्नाटक व तेलंगणाची सीमा लागून आहे. त्यामुळे गुन्हा करून गुन्हेगार दुसऱ्या राज्यात पळून जातात. या गुन्हेगारीला ब्रेक लावण्यासाठी नांदेडमध्ये पाेलीस आयुक्तालय स्थापन हाेण्याची आवश्यकता आहे.
- निसार तांबाेळी
विशेष पाेलीस महानिरीक्षक
नांदेड परिक्षेत्र
नांदेड