नांदेडकरांना प्रतीक्षा शिवशाही बसेसची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:03 AM2018-01-06T00:03:35+5:302018-01-06T00:04:03+5:30
प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवशाही आरामदायी बसेस नजीकच्या लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत, परंतु मागील सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाºया नांदेडकरांचा शिवशाहीचा प्रवास लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवशाही आरामदायी बसेस नजीकच्या लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत, परंतु मागील सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाºया नांदेडकरांचा शिवशाहीचा प्रवास लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे़
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जात आहेत़ आरामदायी प्रवासासाठी बहुतांश विभागात शिवशाही बसेसच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत़ नांदेड विभागासाठी दहा शिवशाही बस येणार होत्या़, परंतु आजपर्यंत एकही बस दाखल झाली नाही़ नांदेड येथून पुणे, मुंबईसाठी जाणारे खाजगी ट्रॅव्हल्स, रेल्वे नेहमी हाऊसफुल्ल धावतात़ त्यामुळे नांदेड येथून पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आदी गर्दीच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जातील, अशी अपेक्षा प्रवाशांना आहे़ मात्र प्रशासनाकडून या मार्गांना बगल देत नांदेड-हैदराबाद या मार्गावर शिवशाही बस सोडण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे़
नांदेडहून दररोज पन्नासहून अधिक खासगी ट्रॅव्हल्स पुण्यासाठी धावतात़ एवढ्या मोठ्या प्रमाणात नांदेड-पुणे मार्गावर प्रवाशांची गर्दी असताना केवळ हैदराबादचे नियोजन केले जात आहे़ त्यामुळे एसटीतील अधिकारी आणि खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याच्या लोकप्रतिनिधींच्या आरोपास दुजोरा मिळतो़ नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पुणे येथे शिक्षण, नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत़ त्यामुळे नांदेड-पुणे-नांदेड मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते़ एसटी प्रशासनाने नांदेड येथून पुण्यासाठी शिवशाही बस सोडली आणि इतर खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे तिकीट ठेवल्यास निश्चितपणे या गाडीला भरभरून प्रतिसाद मिळू शकतो़
मकर संक्रांतीला मिळतील गाड्या
विभागास अद्यापपर्यंत शिवशाही गाड्या मिळाल्या नाहीत़, परंतु मकरसंक्रांतीपर्यंत गाड्या मिळतील, असा अंदाज आहे़ या गाड्या हायर्ड असून त्या आंतरराज्य मार्गावर चालविण्यात येतील, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पी़एस़नेहूल यांनी दिली़