पाण्यासाठी नांदेडकरांचा सर्जिकल स्ट्राईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:49 AM2018-12-23T00:49:20+5:302018-12-23T00:54:39+5:30

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी राखीव असलेल्या २५ दलघमी पाणीसाठ्यांपैकी २० दलघमी पाणी शनिवारी भल्यापहाटे सोडण्यात आले़ दुपारपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात हे पाणी पोहोचले़ विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोपनीय पद्धतीने नियोजन करीत नांदेडकरांनी पाण्यासाठी विरोध करणा-यांवर सर्जिकल स्ट्राईकच केल्याचे दिसून आले़

Nandedkar's Surgical Strike for Water | पाण्यासाठी नांदेडकरांचा सर्जिकल स्ट्राईक

पाण्यासाठी नांदेडकरांचा सर्जिकल स्ट्राईक

Next
ठळक मुद्देदिग्रसचे पाणी नांदेडलाविष्णूपुरी प्रकल्पाचा पाणीसाठा पोहोचला ५० दलघमीवर

नांदेड : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी राखीव असलेल्या २५ दलघमी पाणीसाठ्यांपैकी २० दलघमी पाणी शनिवारी भल्यापहाटे सोडण्यात आले़ दुपारपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात हे पाणी पोहोचले़ विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोपनीय पद्धतीने नियोजन करीत नांदेडकरांनी पाण्यासाठी विरोध करणा-यांवर सर्जिकल स्ट्राईकच केल्याचे दिसून आले़
पाणी सोडण्यासाठी पालम परिसरातील नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता अतिशय गोपनीय पद्धतीने पहाटे तीन वाजताच जलसंपदा विभागाचे अधिकारी मोहीम फत्ते करण्यासाठी पालमकडे रवाना झाले होते़ हक्काचे पाणी मिळविण्यासाठी नांदेडच्या अधिका-यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याचे यातून दिसून आले़ दिग्रसच्या पाण्यामुळे विष्णूपुरीचा पाणीसाठा ५० दलघमीवर पोहोचला असून आगामी दहा महिने हे पाणी शहराची तहान भागवू शकते़
यंदा दिग्रस बंधाºयात ३७ दलघमी पाणीसाठा करण्यात आला होता़ त्यापैकी २५ दलघमी पाणी हे नांदेडसाठी राखीव होते़ दिग्रस बंधाºयाची क्षमता ही ६३ दलघमीची असून त्यापैकी ४० दलघमी पाण्यावर नांदेडकरांचा हक्क आहे़ तशी आराखड्यातच नोंद करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एऩ एम़ कहाळेकर यांनी दिली़
परंतु दिग्रस बंधा-यातून नांदेडला पाणी सोडण्यासाठी परभणीकरांचा मोठा विरोध होत होता़ त्यासाठी अनेक मोर्चेही काढण्यात आले होते़ याबाबत नांदेड दक्षिणचे आ़ हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला़
त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करुन पाणी नांदेडला मिळावे यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या़ त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच दिग्रस बंधारा परिसरात २०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ शनिवारी पहाटे तीन वाजता नांदेडहून जलसंपदा विभागाचे पथक पालमकडे रवाना झाले होते़
रात्रभर जिल्हाधिकारी डोंगरे हे या पथकाच्या संपर्कात होते़ सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास दिग्रस बंधा-याचे १६ पैकी ९ दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ दुपारपर्यंत बंधा-यातील २६ दलघमी पाणीसाठ्यापैकी २० दलघमी पाणी गोदावरीतून विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचत होते़ सोडलेल्या २० दलघमी पाण्यापैकी ८० टक्के पाणी हे विष्णूपुरीत पोहोचणार असल्याचेही कहाळेकर म्हणाले़ दिग्रसचे पाणी विष्णूपुरीत आल्यामुळे आजघडीला विष्णूपुरीच्या पाणी साठ्यात वाढ होवून ते ५० दलघमीवर पोहोचले आहे़
त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़ दरवर्षी मार्च महिन्यात दिग्रस बंधा-यातून नांदेडसाठी पाणी सोडले जाते़ परंतु, यंदा पाण्याची भीषण समस्या असून दिग्रस बंधा-यातील पाणीसाठाही इतरत्र वापरण्यात येत होता़ त्यामुळे नांदेडकरांनी डिसेंबरमध्येच दिग्रस बंधाºयाचे आपल्या हक्काचे पाणी आणले़ या पाण्यामुळे नांदेडकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे़
रोलर गेले चोरीला
विष्णूपुरी प्रकल्पाच्या राईझिंग लाईनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे़ यामागे राईझिंग लाईनमध्ये पाण्याच्या दबावानुसार कमी-जास्त होणारे रोलर चोरीला गेल्यामुळे हा प्रकार घडत आहे़ ही जलवाहिनी ३५ वर्षांपूर्वीची असून त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे़ विशेष म्हणजे, तांत्रिक विभागाने याची काळजी घेण्याची गरज आहे़ जलवाहिनीतून गळती झालेले सर्व पाणी हे परत विष्णूपुरीतच येत असल्याची माहितीही कहाळेकर यांनी दिली़
पाण्यासाठी गोपनीय पद्धतीने केले नियोजन
दिग्रसमधून पाणी सोडण्यासाठी परभणी जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा विरोध होत होता़ बंधारा परिसरात शेतकºयांनी अनेक आंदोलनेही केली होती़ त्यात बंधा-यात केवळ २६ दलघमी पाणी असून त्यातील २० दलघमी पाणी नांदेडला सोडल्यास दिग्रसचे वाळवंट होईल, अशी भीती वर्तविण्यात येत होती़ त्यामुळे पाणी सोडताना अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती़ त्यामुळे पाणी सोडण्यासाठी गोपनीय पद्धतीने नियोजन करण्यात आले़ पहाटे तीन वाजता जलसंपदा विभागाचे पथक दिग्रसकडे रवाना झाले होते़ या ठिकाणी अगोदरच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ सकाळी ६ वा़२० मिनिटांनी नऊ दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ सकाळी अकरा वाजेपर्यंत दिग्रसमधील २० दलघमी पाणी गोदावरीत झेपावले होते़ त्यामुळे परभणीकरांना विरोधाची संधीच देण्यात आली नाही़
अधिका-यांचा गौरव
पाण्यासाठी प्रयत्न करणा-या जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांचा आ़हेमंत पाटील यांनी सत्कार केला़ यावेळी कार्यकारी अभियंता एऩएमक़हाळेकर, उपकार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, शाखा अभियंता मोपले, एल़ बी़ गुडेवार, बी़ एम़ गायकवाड, एस़ आऱ वावरे, एस़व्ही़होळगे यांची यावेळी उपस्थिती होती़ यापूर्वी पथकातील काही अधिकाºयांवर परभणी जिल्ह्यात हल्ल्याच्या घटनाही घडल्या होत्या़ असे असताना हिमतीने आपली मोहीम फत्ते केली़

Web Title: Nandedkar's Surgical Strike for Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.