नांदेडकरांची तहान भागणार; दिग्रस बंधाऱ्यातून पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:45 IST2020-04-27T16:44:47+5:302020-04-27T16:45:42+5:30
जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली.

नांदेडकरांची तहान भागणार; दिग्रस बंधाऱ्यातून पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी
नांदेड़ - नांदेड शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी पहाटे 25 दलघमी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यासाठी होणारा विरोध लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी विष्णुपुरीतून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली. बंधाऱ्याची उभारणी करतानाच नांदेडसाठी या बंधाऱ्यात पाणी राखीव राहील अशी तरतूद करण्यात आली होती. पुढे पाणी मिळत गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून नांदेडला पाणी देण्यास स्थानिकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात पाणी घ्यावे लागत आहे. २२ जानेवारी २०२० रोजी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलनियोजन मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोमवारी पहाटे 5 वाजता बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. सकाळी 9.35 वाजता दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, करडीले, तहसीलदार ज्योती चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील माने यांची उपस्थिती होती.
दिग्रस बंधाऱ्यातून सोडलेल्या 25 दलघमी पाण्यापैकी 20 दलघमी पाणी उपलब्ध होईल अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. जुलै अखेरपर्यंचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे पाणी उपलब्ध झाल्याने मार्गी लागल्याचेही अंधारे म्हणाले.