नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 01:59 PM2024-01-13T13:59:03+5:302024-01-13T14:00:27+5:30
नांदेडसह राज्यातील काही प्रमुख शहरातील विमानतळावरील देखभाल दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे दिले आहे.
नांदेड : येथील विमानतळावर नाइट लॅण्डिंगची सुविधा नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विमानाऐवजी बाय रोड हैदराबादमार्गे मुंबई प्रवास करावा लागला. त्यामुळे नांदेडच्या बंद असलेल्या विमानतळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी आणि हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० जानेवारी रोजी दौऱ्यावर आले होते. नियोजित दौऱ्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी नांदेड येथील विमानतळावर आगमन झाले. नांदेड येथून ते पोफळी येथे कारने रवाना झाले. त्या ठिकाणाहून हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळावा आटोपून परत ते नांदेड येथेच दाखल झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नांदेड येथून विमानाने त्यांना मुंबईचा विमान प्रवास करावयाचा होता. मात्र, त्यांना नांदेड येथे पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. नांदेड विमानतळ मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. नांदेड विमानतळावर नाइट लॅण्डिंगची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दौऱ्यात बदल करावा लागला. सायंकाळी नांदेड येथे पोहोचल्यानंतर त्यांना कारने प्रवास करावा लागला. नांदेडहून कारने ते हैदराबादकडे रवाना झाले. हैदराबाद येथून विमानाने ते मुंबईला पोहोचले.
कंपनीवर होईना कारवाई
नांदेडसह राज्यातील काही प्रमुख शहरातील विमानतळावरील देखभाल दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे दिले आहे. या कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. तसेच नांदेडची विमानसेवा लवकर सुरू केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पण, अद्याप कारवाई झाली नाही आणि विमानसेवाही सुरू झाली नाही. बुधवारी मुख्यमंत्र्यांनाच कारने प्रवास करावा लागल्याने आता या प्रश्नी तातडीने निर्णय होतो का? याविषयी उत्सुकता लागली आहे.