ब्लॅकमेलिंगला कंटाळून नांदेडच्या युवतीची पुण्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:16 PM2018-09-14T23:16:22+5:302018-09-14T23:16:43+5:30
सिंहगड पोलिस ठाण्यात आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड : पुणे येथे शिक्षणासाठी म्हणून गेलेल्या युवतीला एका युवकाकडून सतत ब्लॅकमेलींगचा प्रकार सुरु होता. या प्रकाराला कंटाळून युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सिंहगड, पुणे येथील पोलिस ठाण्यात आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तो मुळचा हिंगोली येथील रहिवाशी आहे.
चक्रधरनगर, तरोडा खु. येथील प्रकाश कोळेश्वर यांची मुलगी प्रतीक्षा (वय १८) ही कोथरुड, पुणे येथील कॉलेजला फॅशन डिझायनींगचे शिक्षण घेत होती. नांदेडला येण्यापूर्वी कोळेश्वर कुंटुंबिय हिंगोली येथे राहत होते. हिंगोलीत शेजारील आरोपी मयुर विजय खोलगडे (रा. अकोला बायपास, एसके टायर्सच्या मागे हिंगोली) हा प्रतीक्षाला सतत फोनकरुन ‘तु माझ्याशी चांगले बोलत नाहीस’ ‘तुझ्या आई-वडिलांना, बहिणीला मारुन टाकीन’ अशा धमक्या देत होता. १३ आॅगस्ट रोजी प्रतीक्षाने ही बाब आईजवळ सांगून भीती वाटत असल्याचे नमूद केले. १५ आॅगस्ट रोजी आरोपी मयुरने प्रतीक्षाच्या आईलाही फोन लावून धमकीवजा भाषा वापरली होती. १६ आॅगस्ट रोजी प्रतीक्षाने आईला फोन करुन तब्येत ठीक नसल्याचे सांगितल्याने आईने तिला हिंगणे खु येथे मावशीकडे जा, असे सूचविले. त्यानुसार प्रतीक्षा मावशीकडे १७ आॅगस्ट रोजी गेली, त्यादिवशी घरात कोणीही नसल्याची संधी साधून प्रतीक्षाने गळफास लावून आत्महत्या केली. माझ्या मुलीच्या मृत्यूला आरोपी मयुर हा जबाबदार असून, त्याने फोन करुन व्हॉट्अप मॅसेज करुन सतत त्रास दिला. त्याच्याकडे असलेल्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत असे.