नांदेडच्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 06:23 PM2018-08-31T18:23:21+5:302018-08-31T18:23:55+5:30
: कृष्णूर धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांचा जामीन अर्ज बिलोलीचे सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांनी फेटाळून लावला़
बिलोली (जि़नांदेड) : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांचा जामीन अर्ज बिलोलीचे सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांनी फेटाळून लावला़ बचाव पक्षाने पुरवठा विभाग तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाचा पुरावा देत बाजू मांडली़ मात्र ती निष्फळ ठरल्याने पोलीस जिंकले, प्रशासन हरले अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.
धान्य घोटाळ्यात मेगा फूड अनाज कंपनीच्या व्यवस्थापकाचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आला़ १८ जुलै रोजी पोलिसांनी १० ट्रक पकडले होते़ ज्यातील तीन ट्रक नायगाव, कुंडलवाडी, मुक्रमाबाद येथे जात होते़ संबंधित ठिकाणी धान्य व्यवस्थित पोहोचविण्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याचे वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांची होती़ मात्र ही जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पाळली नाही़ १० पैकी ७ ट्रक हिंगोली जिल्ह्यातील ठेकेदाराचे निघाले़
तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी याकामी पुढाकार घेवूनसंबंधिताविरूद्ध गुन्हे नोंदविले़ राजू पारसेवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला.
सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद मागील चार दिवसांपासून सुरू होता़ बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला़ त्याचप्रमाणे तिन्ही ट्रकमधील पकडलेले धान्य संबंधित गोदामाच्या शासकीय रजिस्टरवर असल्याचा पुरावा दिला़ दुसरीकडे पारसेवार यांचे सर्व रेकॉर्ड जप्त करण्यात आले़ शासनाशी त्यांचा लेखी करार आहे़ भविष्यातील दररोजची वितरण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मिळावा असे बचाव पक्षाचे अॅड़व्ही़एस़ देशमुख यांनी न्यायालयात सांगितले़ सरकार पक्षाकडून पोलिसांनी केलेली कारवाई, महिनाभरात केलेला तपास या संबंधीचे पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले़ न्या़एस़बीक़चरे यांनी तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना देखील पोलिसांची बाजू मांडण्याची संधी दिली़ जवळपास २० मिनिटे हसन यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले़ या घोटाळ्यात अनेकांचा सहभाग असल्याचे सांगून जामिनाला विरोध केला़ या युक्तिवादानंतर कचरे यांनी पारसेवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला़ सरकारची बाजू अॅड़ दिलीप बोमनाळीकर यांनी मांडली़
पारसेवारच मुख्य सूत्रधार
धान्य घोटाळ्यात राजू पारसेवारच मुख्य सूत्रधार असल्याचा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला़ नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील २२ शासकीय गोदामात धान्य पोहोचविण्याचा ठेका पारसेवार अँड कंपनीकडे आहे़ शासन करारानुसार धान्य वेळेत व योग्य ठिकाणी वाहतुकीची जबाबदारी पारसेवार यांचीच आहे़ १८ जुलैच्या पहिल्या आठवड्यात हदगाव, किनवट, माहूर भागात जाण्याचे ट्रक नायगाव मार्गावर टोलनाक्यावर आढळले़ अशा २६ शासकीय धान्य ट्रकची विल्हेवाट मेगा फूड कंपनीतच झाली़ परिणामी पुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या संगनमताने घोटाळा झाला़ पारसेवार हेच मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले़
पोत्यात भूसा भरुन उचलले कर्ज
कृष्णूर धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे़ पोलिसांनी योग्य रितीने तपास केला़ पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत़ जे न्यायालयात सादर करण्यात आले़ मेगा फूड अनाज कंपनीने धान्य दर्शवून पोत्यात भुसा भरला व बँकेचे कर्ज उचलले़ याबाबतही पुरवठा विभागाच्या वतीने मोजणी सुरू आहे़ कर्ज दिलेल्या बँकांना देखील यासंबंधी कळविण्यात आले़ बँकेला फसवल्याचा गुन्हा कंपनीवर दाखल होवू शकतो
-नुरुल हसन, तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक़