नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा; तेजबीरसिंगने आशियाई तिरंदाजीत साधला सुवर्णपदकावर नेम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:21 PM2024-09-03T19:21:31+5:302024-09-03T19:22:43+5:30
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून तेजबीर सिंग हा आशियाई धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी झाला होता.
नांदेड : चीन येथील तायपेई येथे सुरू असलेल्या आशियाई विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत तेजबीरसिंग जहागीरदारने रविवारी सुवर्णपदक पटकावत नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याने पाच फेऱ्यांत एकूण १४५ गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला.
तेजबीरसिंग जहागीरदार हा मूळचा नांदेडचा असून, त्याचे शालेय शिक्षण नांदेड येथेच झाले. तो इयत्ता आठवीपासूनच धनुर्विद्या स्पर्धेत खेळत आहे. शालेय शिक्षणानंतर त्याने हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बहिर्जी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे सध्या बीएससीचे शिक्षण घेत असून, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून तेजबीर सिंग हा आशियाई धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी झाला होता. चीन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तेजबीर सिंग जहागीरदार याने सहा फेऱ्या पार करत अंतिम फेरी गाठली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने शेवटची फेरी जिंकून भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिले.
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा
हे यश गुरुगोविंदसिंगजी यांच्या आशीर्वादामुळे तसेच प्रशिक्षक, आई-वडील यांच्या सहकार्यामुळे मिळू शकले. भविष्यात देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे असून ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास मी नक्कीच भारताचे नावलौकिक करेन.
-तेजबीर सिंग जहागीरदार, सुवर्णपदक विजेता
यापूर्वी तीनवेळा केले भारताचे प्रतिनिधित्व
यापूर्वी तेजबीरसिंग जहागीरदार याने विद्यापीठाकडून खेळताना यापूर्वी तीनवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्याला पदकाने हुलकावणी दिली होती. या वेळेस मात्र तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला.
देशाची मान उंचावली
तेजबीरसिंग याने कठोर मेहनत करून नांदेड सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलविंतसिंगजी, संत बाबा बलवंतसिंगजी, संत बाबा रामसिंगजी यांच्या आशीवार्दाने नांदेडसह देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
-चरणकमलजीत सिंग जहागिरदार-तेजबीरसिंगचे वडील
...........