कुपोषणावर मात करणारा नांदेडचा ‘यशोदामाता अंगतपंगत’ पॅटर्न आता पोहोचणार राज्यभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:22 PM2020-03-12T18:22:37+5:302020-03-12T18:25:09+5:30
राज्यातील सर्वच अंगणवाड्यामध्ये हा ‘नांदेड पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.
नांदेड : येथील जिल्हा परिषदेने पोषण अभियानासंबंधी राबविलेल्या ‘अंगत-पंगत’ उपक्रमामुळे कमी वजनांच्या बालकांच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून आली. याबरोबरच कुपोषण प्रतिबंध करण्यास तसेच माता मृत्यूचे प्रमाण, नवजात व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम सहाय्यभूत ठरला आहे. त्यामुळेच आता राज्यातील सर्वच अंगणवाड्यामध्ये हा ‘नांदेड पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.
कुपोषण कमी करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनिस तसेच महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी समन्वयाने अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील गरोदर महिलांसाठी मध्यान्ह भोजन कालावधीत एकत्रित ‘अंगत-पंगत’चे आयोजन केले. या उपक्रमामुळे जिल्ह्यात ६ महिने ते एक वर्षे या कालावधीत गरोदर महिलांच्या वजनामध्ये अपेक्षित वाढ दिसून आली. अंगत-पंगत झाल्यानंतर या गरोदर महिलांनी लोहयुक्त गोळ्याचे सेवन केल्याने त्यांच्या हिमोग्लोबीनच्या प्रमाणामध्येही वाढ झाली. तसेच या महिला दैनंदिन संपर्कात राहिल्याने ४ आरोग्य तपासण्याही झाल्या. याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम कुपोषण प्रतिबंध, माता मृत्यूचे प्रमाण, नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास सहायभूत ठरल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये तो राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश महिला व बालविकास विभागाने ६ मार्च रोजी जारी केले.
अंगणवाडी केंद्रात असा असेल उपक्रम
या उपक्रमांतर्गत नोंदणीकृत गरोदर महिला स्वत: मध्यान्ह आहार डब्यामध्ये घेऊन अंगणवाडी केंद्रात येतील. तेथे त्या सहभोजनाचा आस्वाद घेतील. या पंगतीनंतर गरोदर महिला आप-आपसात चर्चा करतील. अंगत-पंगत उपक्रमासाठी येताना त्यांना पुरविण्यात आलेल्या लोहयुक्त गोळ्यांचे पॅकेट घेऊन महिला येतील आणि पंगत उरकल्यानंतर या गोळ्यांचे सेवनही करतील.