कंधार तालुक्यात ४७ गावांसाठीची राष्ट्रीय पेयजल योजना ५ वर्षांपासून कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:11 PM2018-04-04T18:11:40+5:302018-04-04T18:11:40+5:30
पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़
- गोविंद शिंदे
कंधार (नांदेड ) : तालुक्यातील ४७ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या़ गावाच्या लोकसंख्येनुसार मंजुरी देऊन पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात आला़ या योजनेअंतर्गत कंधार तालुक्यातील ४७ गावांसाठी २०१३ मध्ये योजना मंजूर करण्यात आल्या़ मात्र पाच वर्षे उलटली तरीही यातील बहुतांश कामे कागदावरच असल्याचे दिसते़ या कार्यक्रमांतर्गत काटकळंबासाठी ४६ लाख १७ हजार, मंगनाळी व वाडी २२ लाख, मसलगा ३१ लाख ४३ हजार, शिरूर २९ लाख ८२ हजार, राहटी १९ लाख ३७ हजार, नंदनवन ४५ लाख २२ हजार, आलेगाव ५३ लाख ६६ हजार, बाचोटी ५२ लाख २१ हजार, बामणी ४० लाख ८१ हजार, सावळेश्वर २९ लाख ४६ हजार, भंडारकुमठ्याची वाडी १८ लाख ९८ हजार, गोणार २४ लाख ९८ हजार, खंडगाव २६ लाख ९२ हजार, मादाळी १२ लाख ३ हजार यासह तालुक्यातील ४७ गावांत ९ कोटी ४४ लाख ४ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता़
निधी वितरित केल्यानंतर संबंधित गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल, अशी अपेक्षा होती़ मात्र पाच वर्षे उलटली तरी बहुतांश योजना अर्धवट असल्याने पाणीटंचाई कायम आहे़ सद्य:स्थितीत कंधार तालुक्यातील अनेक गावांत टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली असून टँकरसाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले जात आहेत़ योजनेतून पाणीपुरवठा योजनेची कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली असती तर या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नसता़ दरम्यान, मराठा महासंग्राम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे़
... म्हणे ग्रामसेवकाने कागदपत्रेच दिली नाहीत
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत सावळेश्वरचे ग्रामसेवक के़एम़ हाम्पले यांना विचारले असता, योजना अपूर्ण असल्याचे सांगत मागील ग्रामसेवकाने योजनेबाबतची कागदपत्रे पदभारावेळी दिली नसल्याची तक्रार केली़ तर काटकळंबाचे ग्रामविकास अधिकारी एस़ के़ खंडारे यांनी या योजनेसाठी जेवढा निधी मिळाला तेवढा खर्ची झाल्याचे सांगत निधीअभावी कामे अपूर्ण असल्याची कबुली दिली़