राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:27 AM2019-07-13T00:27:47+5:302019-07-13T00:29:44+5:30
किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी ते हिमायतनगर या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाले आहे. त्यातच या भागात झालेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, दुचाकी घसरुन पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले.
किनवट : किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी ते हिमायतनगर या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाले आहे. त्यातच या भागात झालेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, दुचाकी घसरुन पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले.
कोठारी ते हिमायतनगर मार्गाच्या कामाला २७ जून रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. करारानुसार काम २७ जून रोजीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आजघडीला या मार्गाचे केवळ १९ टक्के काम पूर्ण झाले. त्यातही केवळ मुरुम भराव (सबग्रेड) च्या पलीकडे काम पोहोचलेले नाही. अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ३०८ कोटी रुपयांची निविदा असलेले सदर रस्त्याचे काम इन्फोटेक कंपनीला देण्यात आले होते.
कंपनीच्या मालकाने सदर काम सब कंत्राटदार राठी यांना दिले. मात्र या कंत्राटदाराने करारानुसार कार्यवाही केली नाही. या अनुषंगाने आ. प्रदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा लावून धरला होता.
यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री परिणय फुके यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र यावर समाधान न झाल्याने नाईक यांनी सदर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुत्तेदाराला टर्मिनेट करीत त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची घोषणा केली होती.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचा खोडा
अधिवेशनामध्ये सदर महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर रस्त्याचे काम येत्या १५ दिवसांत सुरु करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र या घोषणेला २२ दिवसांचा कालावधी उलटला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांनी तयार केलेले अंदाजपत्रक अद्यापही सचिवस्तरावरच आहे.
या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभाग खोडा घालीत असल्याची चर्चा आहे. तातडीने करावयाच्या कामाला पावसाळ्यानंतर मंजुरी देणार का? असा सवाल आहे. याबाबत बांधकाम विभाग किनवटचे उपअभियंता दिलीप बोबडे म्हणाले, कामाचे अंदाजपत्रक आपण स्वत: तयार केले असून ते मुंबई येथे सचिवांकडे सुपूर्द केले आहे.